स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी डिसेंबरमध्ये आरपारची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:07 PM2017-11-20T23:07:54+5:302017-11-20T23:08:46+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यावर बहिष्कार दर्शविण्यासाठी व विदर्भ राज्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक आम्ही दिली आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यावर बहिष्कार दर्शविण्यासाठी व विदर्भ राज्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक आम्ही दिली आहे. सदर विदर्भ हडताल आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी विदर्भातील प्रत्येक तालुक्यात बैठका सुरू झाल्या आहेत. ही विदर्भ राज्यासाठीची आरपारची लढाई असून या आंदोलनादरम्यान आम्ही विदर्भातील सर्व खासदारांना त्यांचे राजीनामे मागणार आहोत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
चटप पुढे म्हणाले, विरोधात असताना व निवडणुकीच्या कालावधीत विदर्भ वेगळा करू असे आश्वासन देणारे ना. नितीन गडकरी सत्तेत आल्यापासून चूप होते. मात्र, नुकतेच त्यांनी वेगळे राज्य होण्यासाठी विदर्भ सक्षम नसल्याचे प्रतिपादन केले आहे. विदर्भाच्या वाट्याचा पैसा नेहमीच पश्चिम महाराष्ट्राने पळविला. त्यामुळे खºया अर्थाने विदर्भाचा विकास झाला नाही हे वास्तव आहे. असे असले तरी सध्या स्थितीत ४ लाख ७४ हजार ४०० कोटींचे कर्ज असलेला महाराष्ट्र तरी सक्षम आहे काय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
नक्षलग्रस्त भागात ९८४ जणांचे मृत्यू झाले. त्यात पोलीस, नक्षलवादी व सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. नोकरीसाठी विदर्भातील अनेक नागरिक स्थानांतरीत झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे विदर्भातील चार आमदार व एक खासदार कमी झाले. ज्या ठिकाणी कापसाचा शोध लागला त्याच वºहाड भागात सर्वाधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे वास्तव असल्याने हा भाग सध्या शेतकरी आत्महत्याचे केंद्र म्हणून ओळखल्या जात आहे. २६ पैकी २३ खनिज विदर्भात आहे. शिवाय ५४ टक्के वनजमीन विदर्भात आहे;पण त्याचा खरा लाभ विदर्भा शिवाय दुसºयांनीच घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विदर्भातील शेतकरी आत्महत्या या विषयावर लोकसभेत झालेल्या चर्चेत एका खासदाराने विदर्भातील शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले. यावेळी विदर्भातील एकाही खासदाराने त्याला प्रतीउत्तर दिले नाही. ही निंदनिय बाब असून त्यामुळे आम्ही आंदोलनादरम्यान विदर्भातील सर्व खासदारांना त्यांचे राजीनामे मागणार आहो. गत सात वर्षांपासून अनुकंपाची नोकर भर्ती बंद आहे. शिवाय पगार देण्यासाठी पैसेच नसल्याने उच्च न्यायालयातील ४३८ पदे रिक्त आहे. वेगळे विदर्भ राज्य झाले पाहिजे ही विदर्भातील नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी आम्ही ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला विदर्भ माझा, विदर्भ राज्य आघाडी, जनसुराज्य पार्टी व विदर्भ गण परिषदेने पाठींबा दिला आहे. या आंदोलनात विदर्भातील व्यापारी संघटनांनी, शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी वामनराव चटप यांनी केले. पत्रकार परिषदेला माजी आमदार सरोज काशीकर, निळकंठ घवघवे, राम नवले, अभिजीत लाखे, सतीश दाणी, गंगाधर मुटे, अरविंद राऊत, जि.प. सदस्य गजानन निकम आदींची उपस्थिती होती.