डिझाईनसाठी ‘बीडी’चा ‘फंडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 10:34 PM2017-09-02T22:34:38+5:302017-09-02T22:35:20+5:30
गांधी फॉर टुमारो प्रकल्पाचे काम आता कुठे प्रत्यक्ष साकारतेय. २६६.५३ कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम इमानेइतबारे व्हावे, ....
प्रशांत हेलोंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गांधी फॉर टुमारो प्रकल्पाचे काम आता कुठे प्रत्यक्ष साकारतेय. २६६.५३ कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम इमानेइतबारे व्हावे, अशी गांधीजींच्या अनुयायांनी इच्छा आहे; पण गैरप्रकार न करता काम करणार, ते बांधकाम विभाग कसले! डिझाईन मंजूर नसताना, भूमिपूजन व्हायचे असताना कामे सुरू झाली. आता सावरासावर करण्यासाठी महसूल विभागात रूळलेला ‘बॅक डेट’चा फंडा बांधकाम विभाग वापरणार आहे.
सेवाग्राम विकास आराखड्याकरिता शासनाने निधी मंजूर केला. यातील काही कामांचे आराखडे तयार करण्यात आलेत तर उर्वरित आराखडे तयार करण्याच्या सूचना २९ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १४४ कोटी ९९ लाख रुपयांची कामे करण्यात येत आहेत. यासाठी वर्क आॅर्डरही देण्यात आला; पण अद्याप भूमिपूजन करण्यात आले नाही. तत्पूर्वीच कामे सुरू झाली आहेत. कामांचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. यामुळे कामे झपाट्याने हाती घेतली असावी, हे समजता येते; पण डिझाईन मंजूर करून न घेताच कामे सुरू करणे योग्य कसे, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर काम करणाºया जे.पी. कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकांत चांगलीच घबराट पसरली. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना त्यांच्याकडून विचारणा केली गेली. यावर बांधकाम विभागाने काम थांबवून डिझाईन मंजूर करून घेणे गरजेचे होते; पण असे न करता बॅक डेटमध्ये डिझाईन मंजूर करून घेऊ, असा उपटसुंभ सल्ला देत कंत्राटदारांच्या गैरप्रकाराला चालना देण्याचे कामच केल्याचे दिसून येत आहे.
महसूल विभागात शेतजमिनीची खरेदी केल्यानंतर ले-आऊट मंजुरीकरिता बॅक डेटमध्ये खरेदी दाखविली जाते. असे एक नव्हे तर शेकडो प्रकरणे जिल्ह्यात आहेत. तपासात ही बाब उघड झाल्याने आता कुठे कारवाईसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. महसूल विभागातील हा प्रकार आता बांधकाम विभागाद्वारे वापरला जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे एकूण कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
भ्रमणध्वनी उत्तर देईना
सेवाग्राम विकास आराखड्यातील डिझाईन मंजुरीपूर्वीच सुरू झालेल्या कामाबाबत विचारणा करण्यासाठी कार्यकारी अभियंता शरद चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता. यापूर्वीच्या वृत्तासाठी संपर्क केला असता त्यांनी माझी तब्येत बरी नाही, प्रत्यक्ष भेटा, असे सांगितले होते. काम नियमात आहे तर अधिकाºयांची चुप्पी का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.