स्वयंरोजगार उभा करुन सक्षम व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:10 AM2018-03-31T00:10:36+5:302018-03-31T00:10:36+5:30
ग्रामीण भागातील महिलांनाही न्याय मिळाला पाहिजे. ग्राम स्वराज्याचे स्वप्न पाहणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत.
ऑनलाईन लोकमत
पुलगाव : ग्रामीण भागातील महिलांनाही न्याय मिळाला पाहिजे. ग्राम स्वराज्याचे स्वप्न पाहणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यात ग्राम स्वराज योजना असून महिला बचत गट सक्षम व्हावे, त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना कार्यान्वित केली. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना व बचत गटांना स्वयंरोजगारासाठी चालना मिळेल. ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंरोजगार उभा करून सक्षम व्हावे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी नाचणगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा बँक प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.
जिल्हा नियोजन समिती वर्धा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धा, जिल्हा अग्रणी महामंडळ वर्धा यांच्या संयुक्तवतीने नाचणगावच्या सिद्धेश्वर मंदिरात सदर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी मनोहर बाराहाते, देवळी पं.स.च्या सभापती विद्या भुजाडे, जि. प. सदस्य प्रवीण सावरकर, पं. स. उपसभापती किशोर गव्हाळकर, पं. स. सदस्य दिलीप अग्रवाल, दीपक फुलकरी, अरविंद नागतोडे, अनिल पाटील, डॉ. संजय खोपडे, राजेश घोडे, दीपक पिंपरीकर, सिद्धार्थ भोतमांगे आंदीची उपस्थिती होती. यावेळी यशस्वी उद्योजक संध्या कडू, सुनीता मडावी, व अन्य काही महिला उद्योजकांचा तर उल्लेखनिय कार्यासाठी बँक आॅफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक राजेश घोडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन साटोणे यांनी तर आभार ओमलता दरणे यांनी मानले.
आर्वीत तीन युवकांना कर्ज मंजुर
आर्वी- जिल्हा नियोजन समिती, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीआय तसेच एमसीव्हीसी उत्तीण बेरोजगार प्रशिक्षणार्थींसाठी मुद्रा योजना प्रसार आणि प्रचार मेळावा आर्वी येथे गुरुवारी पार पडला. यावेळी गांधी चौक ते सहकार मंगल कार्यालयपर्यंत प्रशिक्षणार्थींची मुद्रा रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचा उद्घाटन आ. अमर काळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण अधिकारी यु.आर. खारोडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, प्रा. अभय दरभे, व्ही. आर. निबांळकर, डी. एल. गायधनी आदी उपस्थित होते. यावेळी मुद्रा योजनेतंर्गत कर्ज घेतलेले यशस्वी लाभार्थी धनंजय कालभुत, दुर्गा वानखेडे, अमीत अहिव यांचा सत्कार करण्यात आला. योगेश ताजणेकर, मंगेश कोसे, स्वप्नील बोबडे या तीन युवकांना कर्ज मंजुर झाल्याचे बँकेचे पत्र प्रदान करण्यात आले. मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात लिड बँकेचे व्यवस्थापक कोहाड, श्रीराम बांधे, मनोज निबार्ते, सुरेश गणराज, युगल रायलू, राकेश कदम आदींनी युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल क्षीरसागर यांनी केले तर आभार पी. एच. रोकडे यांनी मानले.