सावधान ! डेंग्युपासून बचावाकरिता स्वच्छता आणि काळजी महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:20 PM2017-11-20T23:20:29+5:302017-11-20T23:20:59+5:30
जिल्ह्यात गत आठवड्यापासून डेंग्युने चांगलेच थैमान घातल्याचे चित्र आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून डेंग्युने चांगलेच थैमान घातल्याचे चित्र आहे. आर्वी तालुक्यातील विरूळ येथे एका चिमुकल्याचा या आजारामुळे मृत्यू झाला. तर अन्य काही जण उपचार घेत आहेत. याची माहिती मिळताच जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने गावात जात जनतागृती करून नागरिकांवर औषधोपचार सुरू केला आहे. हा आजार होऊ नये म्हणून नागरिकांत जनजागृती गरजेची आहे. वैद्यकीय जनजागृती मंचानेही जनजागृती करणे सुरू केला आहे.
डेंग्यु ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंग्युचा प्रसार हा एडीस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. रांजन, सिमेंटचे टाके, इमारती वरील सिंटेक्स टाके, घराभोवतालच्या टाकावू वस्तू जसे प्लास्टिक बकेट, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरूपयोगी टायर्स, इलेक्ट्रॉनिक्स कचरा, शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, कुलर्स, इत्यादीमध्ये साठलेले पाणी यात होत असते. पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास हा डास अंडी घालतात. यानंतर अळ्यांचे रूपांतर डासात होत असते. त्यासाठी पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवू नये, ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. सध्या डासाच्या उत्पत्तीला पोषक वातावरण आहे. त्या अनुषंगाने अशा साठविलेल्या पाण्यात एडिस इजिप्ती डास अंडी घालून डासोत्पत्ती होते. सदरहू डासाची उत्पत्ती कमी करणे नियंत्रणात ठेवणे, यासाठी जनतेला आरोग्य शिक्षण देणे आवश्यक असून लोकसहभागाशिवाय डेंग्यु या आजाराचे नियंत्रण शक्य नाही. यामुळे नागरिकांनी वेळीच या आजारावर ताबा मिळविण्याकरिता दिलेल्या उपाययोजना कराव्या असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
डेंग्युची लक्षणे
एकाएकी तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढ उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, रक्त मिश्रीत किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे.
घ्यावयाची दक्षता
डेंग्यूचा प्रसार करणारे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतात. आपल्या घराच्या परिसरात साचलेले पाणी तर नाही ना?, जसे कुलर, पाण्याची टाकी, पक्षांचे पिण्याचे भांडे, फ्रिजचा ट्रे, फुलदाणी, नारळाच्यास करवंट्या तुटलेले फुटलेले भांडे व टायर इत्यादीत पाणी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
पाण्याची भांडी व टाकी झाकुन ठेवावी. कुलर रिकामे करून कोरडे करावे. डेंग्युचा डास दिवसा चावणारा असल्यामुळे संपूर्ण अंग झाकेल असेच कपडे वापरावे. डेंग्युचा उपचारावर विशेष औषधी किंवा लस उपलब्ध नाही.
ताप कमी करण्याकरिता पॅरॉसिटामॉल घेता येते. स्वत: एस्प्रिन व ब्रुफेनचा वापर करू नये, डॉक्टराचा सल्ला घ्यावा. डेंग्युच्या प्रत्येक रूग्णास प्लेटलेटची गरज असते. योग्य उपचार योग्य वेळीच घ्या, उपाशा पोटी औषधोपचार घेऊ नका, मांत्रिक व भोंदु-वैद्यांचा सल्ला टाळा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.