काळजी घ्या! सूर्य ओकतोय आग; पारा ४० अंशापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 04:09 PM2022-03-19T16:09:52+5:302022-03-19T16:18:09+5:30
एरव्ही एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअस पार करतो. पण यावर्षी वर्धा जिल्ह्यात होळीपूर्वीच सूर्य आग ओकत आहे.
वर्धा : हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याचे हे भाकीत सध्या खरे ठरत असून, जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याने नागरिकांनीही अधिक दक्ष राहून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
एरव्ही एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअस पार करतो. पण यावर्षी वर्धा जिल्ह्यात होळीपूर्वीच सूर्य आग ओकत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे अनेकांनी त्यांच्या घरातील आणि व्यावसायिक प्रतिष्ठानातील कुलर तसेच एसी सुरू केले आहेत. सध्या सकाळी १० वाजल्यापासूनच अंगाला चटके देणारे ऊन असल्याने अनेक व्यक्ती चढत्या उन्हात घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत असल्याने नागरिकांनीही घराबाहेर पडल्यावर उन्हापासून बचावासाठी धुपट्टा आदीचा वापर करावा. इतकेच नव्हे तर भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
उन्हाची तमा न बाळगता दिली जातेय उन्हाळवाहीच्या कामांना गती
रब्बी पिकांची मळणी तसेच उन्हाळवाहीच्या कामांना शेतकरी सध्या गती देत आहे. असे असले तरी जिल्ह्याचे तापमान सध्या दिवसेंदिवस चांगलेच वाढत असल्याने या दिवसात शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. तसे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
पाणीदार फळांचे सेवन ठरते फायद्याचे
जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकू पाहत असल्याने जीवाची लाहीलाहीच होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाणीदार फळांचे सेवन करणे हे फायद्याचे ठरते. टरबुज, डांगर, द्राक्ष, नारळपाणी आदीचे सेवन करण्याचा सल्ला सध्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक दक्ष राहावे. शिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाणीदार फळांच्या सेवनासह उन्हात घराबाहेर पडताना खबरदारीच्या उपाययोजना कराव्या.
- अर्चना मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.