सावधान ! बोगस खत व बियाण्यांचा शिरकाव

By Admin | Published: June 5, 2015 02:06 AM2015-06-05T02:06:41+5:302015-06-05T02:06:41+5:30

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणे व खतांची जुळवाजुळव करण्याची लगबग जोरात सुरू आहे.

Be careful! Incorporation of bogus fertilizers and seeds | सावधान ! बोगस खत व बियाण्यांचा शिरकाव

सावधान ! बोगस खत व बियाण्यांचा शिरकाव

googlenewsNext

शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सर्तकतेचा इशारा : सर्व प्रकारची बियाणे व खतसाठा मुबलक प्रमाणात
वर्धा : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणे व खतांची जुळवाजुळव करण्याची लगबग जोरात सुरू आहे. बाजारात शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. नेमक्या याच संधीचा फायदा घेत बोगस बियाणे व खतांचा जिल्ह्यात शिरकाव झाला असल्याची कृषी विभागाची माहिती असून यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.
खरीप हंगामाच्या कालावधीत बाजारामध्ये एकदम उसळणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीचा व त्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न काही खोडसाळ बियाणे, खते उत्पादक कंपन्या, वितरक, विक्रेते यांच्याकडून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बोगस व बेकायदेशीर बियाण्यांच्या उत्पादनाला व विक्रीला शासनाची परवानगी नसते. अशा बियाण्यांच्या उत्पन्नासंबंधी मनमुराद व खोटे दावे करून शेतकऱ्यांना आमिष दाखविण्यात येते. अशा बियाण्यांच्या व्यवहारामध्ये शासनमान्य दराचे अधिकृत देयक शेतकऱ्याला दिले जात नाही. अशा बियाण्यांच्या पाकिटावर बियाण्यांच्या गुणवत्तेचा तपशिल व कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसतो. अशा बियाण्यांच्या परीक्षणपूर्व वापरामुळे जमिनीवर तथा पर्यावरणावर विपरित परिणाम होवू शकतो. अशा अनधिकृत बियाणे वापरामुळे जर शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाईची हमी शासन किंवा ग्राहक मंच सुद्धा घेवू शकत नाही. एकदा फसवणूक झाल्यानंतर या परिस्थितीवर मात करुन शेतीचा हंगाम करणे अवघड होईल. तेव्हा आताच शेतकऱ्यांनी सावध होऊन परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच रासायनिक खत, बियाणे व कीटकनाशक खरेदी करावी, अशी माहिती जि.प. कृषी विकास अधिकारी एस. एम. खळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.(जिल्हा प्रतिनिधी)
खत, बियाणे व किटकनाशक खरेदी करताना पक्के देयक घ्यावे
कुठलेही रासायनिक खत, बियाणे व किटकनाशकाच्या अधिकृत व परवानाधारक विके्रत्यांकडूनच खरेदी करीत त्यांना पक्क्या देयकाचा आग्रह धरण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. विक्रेता पक्के देयक देण्यास नकार देत असल्यास किंवा इतर कुठलही शंका, तक्रार असल्यास १८००२३३४००० व ०७१५२-२५००९९ या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर लगेच संपर्क साधून तक्रार नोंदवावी. देयकावर खरेदी केलेल्या बियाण्याच्या गुणवत्तेचा संपूर्ण तपशिल नोंदविलेला आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
बियाणे तुटवड्याच्या नावावर अफवा पसरविण्याची शक्यता
खरेदी केलेल्या बियाण्याचे पाकिट सिलबंद, मोहोरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करा. बियाण्याच्या उगवण क्षमतेच्या अंतिम मुदतीची तारीख पाहूनच पाकिट, बॅग खरेदी करा. एम.आर.पी. पेक्षा अधिक किंमतीने विक्री संबंधात त्वरीत कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी. रासायनिक खत खरेदी करताना बॅग वरील एम.आर.पी. किंमत बघुनच खरेदी करावी. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारची बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी खास वाणांचा तुटवडा असल्यास अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही अपप्रचारावर विश्वास न ठेवता परवानाधारक विक्रेत्यांकडूनच कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात. तसेच काही कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रलोभनावर विश्वास ठेऊ नये.
आर. आर. नावाचे बीटी बियाणे बोगस - कृषी विकास अधिकारी
बाजारात किंवा इतर व्यक्तीद्वारे महाशक्ती आर.आर. किंवा बी.जी.-३ इत्यादी नावाने बियाणे जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नावाने कोणतेही अनधिकृत कंपनीचे किंवा इतर प्रतिनिधीद्वारे पेरणीसाठी बियाण्यांचा आग्रह केला जाऊ शकतो. अशी बियाणे कोणत्याही प्रकारची चाचणी न होता बाजारात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.
अशा अनधिकृत खरेदी केलेल्या बियाण्यांचे कोणतेही देयक किंवा परवाना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बोगस बियाण्यामुळे नुकसान झाल्यास कोणतीही नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस. एम. खळीकर यांनी बोलताना दिली.

Web Title: Be careful! Incorporation of bogus fertilizers and seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.