सावधान! ‘स्वाईन फ्ल्यू’ देतोय धडक
By admin | Published: September 10, 2015 02:32 AM2015-09-10T02:32:57+5:302015-09-10T02:32:57+5:30
सबंध देशातील नागरिकांना काही वर्षांपासून आरोग्याच्या दृष्टीने त्रस्त करणारा ‘स्वाईन फ्ल्यू’ या आजाराने जिल्ह्यात पुन्हा धडक दिली आहे.
सामान्य रुग्णालयात आढळला रुग्ण : नागरिकांनी खबरदारी घेणे झाले गरजेचे
वर्धा : सबंध देशातील नागरिकांना काही वर्षांपासून आरोग्याच्या दृष्टीने त्रस्त करणारा ‘स्वाईन फ्ल्यू’ या आजाराने जिल्ह्यात पुन्हा धडक दिली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एका चार वर्षीय बालक स्वाईन फ्ल्यूने ग्रस्त असल्याचे समोर आले होते. सदर बालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. यासाठीच जिल्हा सामान्य रुग्णालयाकडूनही सावधगिरीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
शहरातील सानेगुरूजी नगर येथील एका चार वर्षीय बालकाला २ सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तपासणी करून ठशांचे नमूने पाठविले असता ४ सप्टेंबर रोजी स्वाईन फ्ल्यू पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. अहवाल प्राप्त होताच रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्याच्यावर त्या दिशेने उपचार करण्यात आले. यामुळे बालकाच्या प्रकृतीत लगेचच सुधारणा झाली. जिल्ह्यातील अन्य कुठल्याही रुग्णालय वा खासगी दवाखान्यांमध्ये स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळून आल्याची नोंद नाही. स्वाईन फ्ल्यू पॉझिटीव्ह आढळलेला सदर बालक आपल्या पालकांसोबत नाशिक येथील कुंभमेळ्यामध्ये गेला होता, अशी माहितीही देण्यात आली आहे. नाशिक येथून परतल्यानंतरच सदर बालकाला सर्दी, खोकला व ताप जाणवत होता. यामुळे त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीमध्ये स्वाईन फ्ल्यू पॉझिटीव्ह आढळून आला होता. योग्य आणि वेळीच उपचार मिळाल्यामुळे सदर बालकाची प्रकृती सुधारली.
वास्तविक, ऋतू बदलाच्या कालावधीमध्ये असणारे वातावरण स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूला पोषक असते; पण सप्टेंबर महिन्यातच स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळला. सध्या पावसाळा सुरू असून डेंग्यू या आजाराकरिता हे वातावरण पोषक असते. गतवर्षी डेंग्यूचा मोठा प्रकोप होता; पण जनजागृतीनंतर यावर्षी डेंग्यूचे रुग्ण आढळून येत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाद्वारे सांगण्यात आले. स्वाईन फ्ल्यू च्या विषाणूसाठी हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूमधील कालावधी पोषक मानला जातो. याच काळात स्वाईन फ्ल्यूचे विषाणू पसरतात. असे असले तरी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने खबरदारी म्हणून काही उपाययोजना करण्यात येत आहे. शिवाय खासगी रुग्णालये, दवाखाने यांच्याकडूनही दररोज आजार आणि रुग्णांची माहिती घेतली जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)
स्वाईन फ्ल्यू हा हवेमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. मार्च २००९ मध्ये मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाल्याची नोंद आहे. यानंतर या आजाराने सर्वत्र नागरिकांना जेरीस आणले. वर्धा जिल्ह्यातही गतवर्षी अनेक रुग्ण आढळून आले होते.
स्वाईन फ्ल्यू हा आजार एन्फ्लूएन्झा ए (एच वन, एन वन) या विषाणूमुळे होतो.
या आजाराची लक्षणे साधारण तापाप्रमाणेच असतात. यामुळे सुरूवातीला आजाराचे योग्य निदान होत नाही. या आजाराची लागण झाल्यास सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि क्वचित प्रसंगी उलट्या, जुला ही सर्वसाधारण लक्षणे आढळतात.
या आजाराचा प्रसार हवेतून होतो. स्वाईन फ्ल्यू बाधित रुग्णांच्या शिंक आणि खोकल्यातून हे विषाणून हवेद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात.