कीटकजन्य आजारापासून सावध राहा
By admin | Published: October 12, 2014 11:49 PM2014-10-12T23:49:01+5:302014-10-12T23:49:01+5:30
ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग याशिवाय कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य नाही. कोणताही ताप आल्यास तपासणी करुन घ्यावी, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी,
वर्धा : ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग याशिवाय कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य नाही. कोणताही ताप आल्यास तपासणी करुन घ्यावी, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, अंगावर पुरळ येणे, तापामध्ये चढउतार अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करुन निदान करावे. सावधगिरी बाळगणे हाच आजावरील प्रभावी उपचार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता झोपाटे यांनी सांगितले.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात डेंगी जनजागरण मोहिम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र खरागंणा (मो.) अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये डेंग्यू आजारावरील प्रतिबंधात्मक उपयांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. झोपाटे यांनी नागरिकांना माहिती दिली. डेंगी सदृष्य लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करण्याचे आवाहन केले.
खरागंणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप पाहता सर्व ग्रामपंचायतीत भेटी देवून मार्गदर्शन केले. डेंगीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून डासांच्या उत्पतीची स्थाने असलेले पिण्याच्या पाण्याची भांडी, टाके, माठ, रांजण व टाक्या, तुडूब भरलेल्या नाल्या, कुंड, कुलर यांची स्वच्छता करून एकदा उन्हात कोरडे करावे. यासह अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितले.
येथील स्वावलंबी विद्यालयाच्या पथकाने कीटकजन्य व जलजन्य आजारांविषयी पथनाट्यातून जागृती केली. डासांच्या दंशापासून स्वत: चा बचाव करा असा संदेश दिला. यानंतर मान्यवरांनी प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या घरी स्वच्छता मोहिम राबवावी. एक लहानसा मच्छर म म्हणजे मारणारा, छ म्हणजे छळणारा आणि र म्हणजे रयतेला असा हा मच्छर मनुष्याचे प्राण हरण करतो अशी माहिती दिली.
यावेळी नागरिकांना कीटकजन्य आजारावर मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य चमुने केले.(स्थानिक प्रतिनिधी)