आत्महत्या नव्हे तर हत्येच्या दिशेने तपास व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:11 AM2018-04-09T01:11:52+5:302018-04-09T01:11:52+5:30
सेलू तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबातील युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह रेल्वे रूळावर टाकून आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेलू तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबातील युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह रेल्वे रूळावर टाकून आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात केवळ आत्महत्येच्या दिशेने तपास होत असून पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास करण्याबाबत सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करण्यात येईल, यावर रविवारी स्वाध्याय मंदिरात आयोजित बैठकीत एकमत झाले.
शुभांगी उईकेच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना अभय दिले जात असल्याचा आरोप करीत आदिवासी समाजबांधवांनी आक्रोष मोर्चा काढला. या मोर्चाची दखल घेत वर्धेतील विविध सामाजिक संघटनांनी एकजूट होत प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचा निर्णय घेतला. यात ‘लोकमत’च्या वृत्ताने जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी एकत्र येत या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. याचीच दिशा ठरविण्यासाठी आज सभा आयोजित होती. या सभेला जिल्ह्यातील एकूण ४८ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्णय घेतला. यावेळी आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह काही निवृत्त पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. त्यांनीही परिस्थितीजन्य पुराव्याची माहिती घेतली असता या प्रकरणात हत्येचा संशय वर्तविला आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी आदिवासी नेते अवचित सयाम होते. शुभांगीच्या मृत्यू प्रकरणी पोलीस तपासाविरूद्ध एकत्र येण्याची भूमिका मनोहर पंचारिया यांनी मांडली. उपस्थित सर्व पदाधिकाºयांनीही मते मांडली. यात न्यायालयीन लढा उभारण्याची मतेही अनेकांनी मांडली. वर्धेत रूपेश मुळे हत्या प्रकरणात सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत लढा उभारला; पण पोलिसांनी तपासात मेख मारल्याने आरोपींची सुटका झाली. या प्रकरणात असे झाल्यास न्यायालयात लढा देण्याबाबतही चर्चा झाली. शुभांगीला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्णयही संघटनांच्या पदाधिकाºयांनी घेतला.
शुभांगीच्या न्यायासाठी पुकारलेल्या बैठकीत वर्धेतील सर्वच सामाजिक संघटना एकवटल्याचे दिसून आले. यावेळी रामभाऊ सातव, संजय इंगळे तिगावकर, प्रा. शिवाजी इथापे, भास्कर इथापे, हरिष इथापे, सुनीता इथापे, मीनल इथापे, नूतन माळवी, अविनाश काकडे, राजू मडावी, कॉग्रेस कमिटीचे सुनील कोल्हे, राजेंद्र शर्मा, इक्राम हुसेन, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व्यंकटेश बुंदे, दिलीप उटाणे, सीताराम लोहकरे, अस्लम पठाण, सुचिता ठाकरे, रोटरी क्लबच्या संगिता इंगळे तिगावकर, निरज गुजर, प्रा. नाखले, अमिर अली अजानी, गंगाधर पाटील, मंगेश चोरे, सुनील ढाले, सतीश मडावी, डॉ. शरद सावरकर, संजय चिडाम, चंद्रशेखर मडावी, पंकज वंजारे यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेत होणाºया निर्णयाच्या पाठीशी राहण्याची कबुलीही याप्रसंगी सर्वच संघटनांनी दिली.
एकूण ४८ संघटनांचा सहभाग
शुभांगी मृत्यू प्रकरणात न्याय देण्याच्या मागणीकरिता पुकारलेल्या या बैठकीत वर्धेतील तब्बल ४८ संघटना एकत्र आल्या. या संस्थांची एक वज्रमुठ तयार झाली असून शुभांगीला न्याय मिळण्याची आशा दिसून येत आहे.
प्रारंभी तीन मुद्यांकडे वेधणार लक्ष
सोमवारी या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षकांचे तीन मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. प्रथम आत्महत्येच्या दिशने नव्हे तर हत्येच्या दिशेने तपास करावा, निष्पक्ष तपासाकरिता एसआयटीला तपास द्यावा व पीडितेच्या परिवाराला न्याय देत गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, आदी मागण्या निवेदनातून करणार आहे. केवळ निवेदन देऊन संघटना स्वस्थ बसणार नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
रूपेश मुळे नरबळी प्रकरणात पोलिसांवर ताशेरे
वर्धेतील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात पोलिसांनी तपासात मेख मारल्याने आरोपी निर्दोष मुक्त झाला. यामुळे पोलीस तपासावर लक्ष केंद्रित करून लढा उभारावा, असे म्हणत पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले.