प्रत्येक सोमवारी मुख्यालयी उपस्थित राहावे
By admin | Published: January 21, 2016 02:04 AM2016-01-21T02:04:30+5:302016-01-21T02:04:30+5:30
प्रत्येक सोमवारी अधिकारी, कर्मचारी यांनी पूर्णवेळ मुख्यालयी उपस्थित राहावे, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते;
आशुतोष सलील : ‘लोकमत’ वृत्ताची दखल घेत दिल्या सूचना
वर्धा : प्रत्येक सोमवारी अधिकारी, कर्मचारी यांनी पूर्णवेळ मुख्यालयी उपस्थित राहावे, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते; पण सोमवारी (दि.१८) पंचायत समितीच्या बैठका घेण्यात आल्या. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी प्रत्येक सोमवारी अधिकारी, कर्मचारी यांनी पूर्णवेळ मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना बुधवारी दिल्या.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही त्यांनी याबाबत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक सोमवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ मुख्यालयी उपस्थित राहून कार्यालयात येणाऱ्या लोकांच्या समस्या, तक्रारी जाणून घेत त्यांचे निरसन करावे. सोमवारी कोणतीही बैठक आयोजित करू नये. जे अधिकारी, कर्मचारी सोमवारी कार्यालयात उपस्थित राहणार नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देशही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी पूर्णवेळ मुख्यालयी उपस्थित राहावे. मुख्यालयाबाहेर बैठकीस, दौऱ्यावर जाऊ नये. या दिवशी बैठकीसाठी अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांना बोलवू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)