नैसर्गिक आपत्तीसाठी सज्ज राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:05 PM2018-05-21T22:05:20+5:302018-05-21T22:05:32+5:30
जीर्ण झालेल्या अत्यंत धोकादायक शासकीय इमारती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडून टाकाव्या. नैसर्गिक आपत्तीत जीव वाचवणारी आवश्यक साधने जसे बोट, लाईफ जॅकेट्स, दोर आदी साधनांची पूरेशी व्यवस्था करण्याससह ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांत औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जीर्ण झालेल्या अत्यंत धोकादायक शासकीय इमारती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडून टाकाव्या. नैसर्गिक आपत्तीत जीव वाचवणारी आवश्यक साधने जसे बोट, लाईफ जॅकेट्स, दोर आदी साधनांची पूरेशी व्यवस्था करण्याससह ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांत औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुुरूषोत्तम मडावी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात कार्यालयात वीज पुरवठा खंडित झाल्यास काम बंद पडू नये यासाठी नादुरूस्त डिझेल इंजिन कार्यालयाने तातडीने दुरूस्त करून घ्यावे. त्यासाठी निधी आवश्यक असल्यास तत्सम मागणी नोंदवावी. उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांत औषधी साठा, डॉक्टरांची चमू, वीज पुरवठा, इमर्जन्सी आॅपरेशन थिएटर तयार ठेवावे. तसेच रुग्णालयाची तात्पुरती डागडुजी करून घ्यावी. यासाठी रुग्णकल्याण समितीला ५ लाख रुपये देण्यात येतील. हे काम रुग्ण कल्याण समितीने करावे. या सर्व रुग्णालयांची तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी पाहणी करून खातरजामा करावी. ग्रामीण भागात अवैध दारू व्यवसायांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच आपत्ती काळात तत्पर कार्य करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ग्रामसुरक्षा दल स्थापन करून जूनच्या पहिल्या आठवड्यात तहसीलदारांनी त्यांची बैठक घ्यावी. सर्व विभाग प्रमुखांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात जबाबदारीने कामे करावी. हलगर्जीपणा करणाºया अधिकाºयावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही नवाल यांनी बैठकीत सांगितले.