जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेड ओक्यूपेन्सी दर ९३.०७ टक्क्यांवर; चोवीस तासांत नवीन ५७ रुग्ण दाखल
By महेश सायखेडे | Published: October 7, 2023 04:46 PM2023-10-07T16:46:14+5:302023-10-07T16:46:49+5:30
२६९ रुग्णांवर होताहेत उपचार
वर्धा : जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा १५ ऑगस्टपासून मोफत करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येत तिप्पटीनेच वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील सोई-सुविधांचा शनिवारी रिॲलटी चेक केला असता जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेड ओक्यूपेन्सी तब्बल ९३.०७ टक्के इतकी असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
शनिवारी जिल्हा रुग्णालयात दाखल २६९ विविध आजारांच्या रुग्णांना उपचार दिले जात होते. विशेष म्हणजे मागील २४ तासांत जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ५७ रुग्णांना दाखल करून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असली तरी जिल्हा रुग्णालयात दाखल प्रत्येक रुग्णाला उत्तम शासकीय आरोग्य सेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न कार्यरत डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
दहा रुग्णांना केले रेफर आऊट
मागील २४ तासांत जिल्हा रुग्णालयात ५७ नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे. यात पाच रेफरीन रुग्णांचा समावेश आहे. मागील २४ तासांचा विचार केल्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तब्बल दहा रुग्णांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम, सावंगी (मेघे) तसेच नागपूर येथील रुग्णालयात रेफर आऊट करण्यात आले आहे.
आयसीयूत सात तर चाईल्ड वॉर्डात तेरा रुग्ण
जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. चाईल्ड वॉर्डात सध्या तेरा रुग्ण दाखल असून मागील २४ तासांत एका छोट्या मुलाला पुढील उपचारासाठी रेफर आऊट करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात सुसज्य असा अतिदक्षता विभाग आहे. या विभागात सध्या सात रुग्ण असून त्यांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
एसएनसीयूमध्ये अठरा नवजात बालकांवर होताहेत उपचार
नवजात बालकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी या हेतूने जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्य असा एसएनसीयू कक्ष तयार करण्यात आला आहे. या विभागात सध्या १८ नवजात बालके दाखल असून गत चोवीस तासांत सेलू येथून रेफर आऊट केलेल्या एका नवजात बालकाला जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये दाखल करून घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
एकाचा झाला मृत्यू
पुलगाव नजीकच्या विरुळ येथून पुढील उपचारासाठी रेफर आऊट केल्यानंतर एका ५४ वर्षीय पुरुषाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दारूपिण्याच्या सवईचा आणि जंतू संसर्ग झालेल्या या रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याबाबतची नोंद रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे.