बीडप्रमाणे महाआरोग्य शिबिर राबवा
By admin | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:35+5:302016-04-03T03:51:35+5:30
महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून बीड जिल्ह्यात बहुसंख्येने रुग्णांची तपासणी करण्यात आली. तशाचप्रकारे वर्धेतही महाआरोग्य शिबिराचा लाभ येथील सर्व दवाखाने,
किशोर तिवारी : जिल्हा सामान्य रुग्णालयात बैठक
वर्धा : महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून बीड जिल्ह्यात बहुसंख्येने रुग्णांची तपासणी करण्यात आली. तशाचप्रकारे वर्धेतही महाआरोग्य शिबिराचा लाभ येथील सर्व दवाखाने, सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून एकत्रित येऊन रुग्णांना देण्यात यावा. त्याचबरोबर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभही प्रभावीपणे लाभार्थ्यांना देण्यात यावा, अशा सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी केल्या.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, कस्तुरबा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गिरीश देव, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, अस्थीव्यंग शल्यचिकीसक अनुपम हिवलेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, वर्धेच्या उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, घनश्याम भूगावकर, प्रशांत इंगळे तिगावकर, सुरेश वाघमारे आदींची उपस्थिती होती.
किशोर तिवारी म्हणाले, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रशासनाची, सरकारची साथ संपूर्ण यंत्रणेला आहे. याबाबत कुणाला अडचण येत असल्यास त्यांनी संबंधीत तहसीलदार, पुरवठा अधिकारी यांच्याशी संबंधित कागदपत्रांकरिता संपर्क साधून योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून द्यावा.
जिल्ह्यात कस्तूरबा हॉस्पीटल, सावंगी मेघे येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि इतरही रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांची मोठ्याप्रमाणात सेवा करण्यात येते; परंतु राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत तांत्रिक अडचणी येत असल्यास संबंधित प्रशासकीय यंत्रणेद्वारे तत्काळ अडचणी सोडविल्या जातील. त्याबाबत आवश्यक त्या सूचनाही त्यांनी संबंधितांना केल्यात.
पात्र लाभार्थी रुग्णांना योजनेचा लाभ मिळावा
वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालय, विनोबा भावे रुग्णालय आणि सेवाग्राममधील येणाऱ्या पात्र लाभार्थी रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा. लाभ देताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सूचनाही कराव्यात असेही त्यांनी सांगितले. योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नसेल वा नाकारला जात असेल तर याबाबत जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेऊन पात्र व्यक्तीस लाभ मिळवून देण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पूर्व विदर्भात सामान्य रुग्णालयाच्यामाध्यमातून रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारची सेवा देण्यात येत असल्याचे सांगून सेवाग्राम येथील कस्तुरबा आणि सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयातही रुग्णांना अतिशय चांगली सेवा पुरविल्या जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. परंतु शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याकरिता सर्वांनीच पुढाकार घेऊन राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या हस्ते किशोर तिवारी यांना पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचा तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा यांचे स्वागत केले. प्रास्ताविक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया यांनी केले. आभार जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी मानले. बैठकीस राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा प्रमुख रितेश गुजरकर, समन्वयक डॉ. मेश्राम यांची उपस्थिती होती. तसेच डॉ. राणे, डॉ. सचिन पवार, डॉ. भारत सोनटक्के, डॉ. सुमनलता पांडे, डॉ. ऋषीकेश ठाकरे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, तहसीलदार राहुल सारंग, सचिन यादव, दीपक कारंडे, सीमा जगभिये, मनोहर चव्हाण, तेजस्वीनी जाधव, आर.एस. होळी, मडावी, देवकुमार कांबळे, वाय.बी. सपकाळे, बी. डब्ल्यू यावले आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)