लावण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:24 AM2018-06-11T00:24:54+5:302018-06-11T00:24:54+5:30
जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमण झाले. शनिवारी अनेक भागात दमदार पाऊस झाला. पावसाच्या सरी कोसळताच बळीराज पेरता झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमण झाले. शनिवारी अनेक भागात दमदार पाऊस झाला. पावसाच्या सरी कोसळताच बळीराज पेरता झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. पाऊस येताच बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड होत आहे. तर सोयाबीन व इतर वाणांच्या पेरणीचे नियोजन सुरू आहे.
जिल्ह्यात योग्य पाऊस आल्याशिवाय पेरणी करू नका असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सावधगिरी म्हणून अद्याप पेरण्या केल्या नाही. पेरणी नंतर पाऊस बेपत्ता झाल्यास मोड येवून दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करण्याची वेळ येण्याशी शक्यता कृषी विभागाच्या सल्ल्यावरून दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तर काही शेतकºयांनी कृषी विभागाचा हा सल्ला बाजूला ठेवत आपल्या अनुभवावरून पेरण्या सुरू केल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यांनी शनिवारचा पाऊस येण्यापूर्वीच कपाशीची लागवड केल्याचे दिसून आले आहे. तर काही शेतकऱ्यांकडून आज रविवारी सकाळपासून लागवडीला प्रारंभ झाला आहे.
पाऊस येण्यापूर्वी ज्या कापूस उत्पादकांनी कपाशीची लागवड केली त्यांची पेरणी साधल्याचे बोलले जात आहे. यात पावसाचा खंड पडल्यास शेतात असलेल्या ओलिताचा लाभ त्यांच्याकडून होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडूनच कपाशीची लागवड होत असल्याचे दिसून आले आहे. तर शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणि तुरीची लागवड अद्याप झाली नसल्याचे दिसत आहे. त्याला लवकरच प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वत्र कपाशीच्या लागवडीला जोर
मागील खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे यंदा कपाशीचे क्षेत्र घटेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यात पाऊस येण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड झाल्याचे दिसून आले आहे.
सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यात
वर्धा जिल्ह्यात शनिवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यात झाला आहे. येथे ६९ मीमी पावसाची नोंद झाली आहे. वर्धा तालुक्यात ३७.४८, देवळी २३.६०, आर्वी ३६.१५, आष्टी १७.०३, कारंजा १४.५९, हिंगणघाट ४३ तर समुद्रपूर येथे १७ मीम पावसाची झाली आहे. याची एकूण बेरीज २५८.१३ मीमी असून त्याची सरासरी ३२ मीमी आहे. एवढा पाऊस पेरणीकरिता पुरेसा असल्याचे बोलले जात आहे.
काही बियाण्यांनी बिटीतच मिसळविले नॉन बिटी तर काहींकडून वेगळी व्यवस्था
शासनाच्यावतीने यंदा कपाशीच्या बियाण्यांबाबत अधिकच सावधगिरी बाळगली गेल्याचे दिसून आले आहे. अनेक कंपन्यांना बाजारात विक्रीकरिता येत असलेल्या त्यांच्या वाणावर बंदी घालण्याच्या सूचना केल्या. बोंड अळीला बिटी आणि नॉन बिटीत झालेली गफलत एक कारण असल्याचे सांगण्यात आले. यामुळे कपाशीची बियाणे विकणाऱ्या काही कंपन्यांनी त्यांच्या बिटी बियाण्यांतच नॉन बिटी मिसळविले आहे तर काही कंपन्यांकडून त्याची वेगळी पाकिटे देण्यात येत आहे. ही नॉन बिटी बियाणे शेताच्या धुऱ्यावर सभोवताल लावण्याच्या सूचना करण्यात आल्या असताना शेतकऱ्यांकडून तसे झाले नाही. यामुळे कपाशीवर बोंडअळीचा हल्ला झाल्याचे या कंपन्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
आर्थिक अडचण कायमच; अनेकांकडून अद्यापही बी-बियाण्यांची खरेदी नाही
यंदाच्या खरीप हंगामाच्या तोंडावर जाहीर झालेली कर्जमाफी आणि त्यात व्याजाच्या रकमेवरून झालेला गोंधळ यामुळे अनेकांचा सातबारा कोरा झाला नाही. परिणामी त्यांना बँकांकडून नवे पिककर्ज नाकारण्यात आले. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना बी-बियाणे कशी घ्यावी अशी चिंता पडली आहे. शिवाय तूर आणि चण्याचे चुकारे अडल्याने शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटल्याचे दिसत आहे. या आर्थिक अडचणीवर मार्ग काढून पेरणी साधण्याकरिता शेतकरी प्रचत्नरत आहे.