बिहाडीत अग्नितांडव, दोन घरे, तीन गोठे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:47 PM2018-04-28T23:47:12+5:302018-04-28T23:47:12+5:30
तालुक्यातील बिहाडी येथे शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अग्नितांडव घडला. अचानक लागलेल्या आगीत दोन घरे व तीन गोठे जळून खाक झाले. यात ४० लाखांच्या वर नुकसान झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यातील बिहाडी येथे शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अग्नितांडव घडला. अचानक लागलेल्या आगीत दोन घरे व तीन गोठे जळून खाक झाले. यात ४० लाखांच्या वर नुकसान झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले.
बिहाडी गावात शुक्रवारी रात्री अचानक गावठाण शिवारात आग लागली. ही आग पसरत जाऊन संदीप, शरद व सुनील तुकाराम धांदे या भावंडांचे तीन गोठे जळून खाक झाले. यात गुरांचा चारा, शेतीसाहित्य जळाले. गोठ्यांना लागूनच महादेव तुळशीराम रेवतकर व आशा माणिक भोयर यांचे घर असून त्यांच्या घरांनाही आगेने आपल्या कवेत घेतले. आगीत घरातील संपूर्ण साहित्य, अन्नधान्य भस्मसात झाले. माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकत्र येत आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण आग आटोक्यात येत नव्हती. आर्वी व पुलगाव येथून बोलविलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविल्याने पूढील अनर्थ टळला. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. जीवनावश्यक तथा शेतीपयोगी साहित्याचा कोळसा झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शनिवारी नायब तहसीलदार बर्वे, तितरे, मंडळ अधिकारी सांभारे, तलाठी गद्रे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यात रेवतकर यांचे ३ लाख ५५ हजार, भोयर यांचे १ लाख ३५ हजार, संदीप धांदे ९७ हजार, शरद धांदे ९० हजार व सुनीलचे ६५ हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनास दिला.
बकऱ्या विकून आणलेला गहूदेखील भस्मसात
आशा भोयर ही विधवा महिला चार मुलींसोबत संसाराचा गाडा चालविते; पण शुक्रवारची रात्र त्यांना उद्ध्वस्त करून गेली. घरातील संपूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. बकऱ्या विकून विकत घेतलेला गहूदेखील आगीत स्वाहा झाला. रेवतकर यांच्या घरातीलही संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. यामुळे दोन्ही कुटुंब उघड्यावर आले असून त्वरित शासकीय मदतीची गरज व्यक्त होत आहे.
उदरनिर्वाहासाठी दिले धान्य
शनिवारी पं.स. सभापती मंगेश खवशी यांनी बिहाडी गाठत पाहणी केली. यावेळी त्वरित आशा भोयर यांना निराधार योजनेतून आर्थिक मदत सुरू करावी, अशी मागणी तहसीलदारांना केली. खवशी यांनी दोन्ही कुटुंबांना उदरनिर्वाहाकरिता साखर, तांदूळ व अन्य किराणा त्वरित देण्यात आला.
दोन जनावरे जखमी
अचानक लागलेल्या आगीत गोठ्यात बांधून असलेली दोन जनावरे होरपळली गेली. आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने गोठ्यातील गुरे बाहेर काढण्यात आली. शिवाय भोयर व रेवतकर यांच्या कुटुंबातील सदस्य त्वरित घराबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.