विधीज्ञ मंडळाच्या सदस्यांशी असभ्य वर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:10 AM2017-07-25T01:10:44+5:302017-07-25T01:10:44+5:30
कार्यालयीन कामकाज करताना तहसीलदार विधी सेवा मंडळाच्या सदस्यांना असभ्यतेची वागणूक देतात,...
तहसीलदारांचा प्रताप : संतप्त वकिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : कार्यालयीन कामकाज करताना तहसीलदार विधी सेवा मंडळाच्या सदस्यांना असभ्यतेची वागणूक देतात, असा ठपका ठेवत त्यांच्या विरूद्ध कारवाईचा ठराव विधी सेवा मंडळाने सोमवारी पारित केला. याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार विजय पवार यांनी विधीज्ञ मंडळाच्या सदस्यांशी काम करताना अभद्र भाषेचे वापर करीत अपमानास्पद वागणूक दिली आहे. तहसीलदार पवार यांनी विधीज्ञ मंडळाचे वरिष्ठ अधिवक्ता व्ही.टी. देशपांडे यांनाही लिला विरूद्ध गंगाधर प्रकरणात उद्धट वर्तणूक करीत युक्तीवाद दोन मिनीटात करा, दुसऱ्या कोर्टात तुम्ही अधिक युक्तीवाद करत असाल, माझ्यासमोर हे चालणार नाही, असे म्हटले. या अनुषंगाने आर्वी विधीज्ञ मंडळाच्यावतीने त्यांच्या विरूद्ध तक्रार करण्याबाबत सर्वानुमते ठराव घेण्यात आला होता; पण वेळेअभावी तक्रार नोंदविली नव्हती. शुक्रवारी विधीज्ञ मंडळाचे सदस्य रोहित राठी न्यायालयीन कामाबाबत तहसीलदार यांच्या दालनात गेले असता तुम्ही कसे काय आले, तुम्हाला कुणी बोलविले, बाहेर निघा नाही तर धक्के मारून बाहेर काढतो आणि ३५३ चा मामला दाखल करतो, असे म्हणत गैरवर्तन केले. यामुळे तहसीलदार पवार यांच्याकडे विधीज्ञांचे काम करणे कठीण झाले.
याबाबत सोमवारी आर्वी विधीज्ञ मंडळाद्वारे तहसीलदार पवार यांच्या विरूद्ध कार्यवाही व्हावी म्हणून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. तहसीलदार विजय पवार यांना त्वरित निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवून विभागीय चौकशीचे आदेश देत कायदेशीर कार्यवाही करावी. तोपर्यंत तालुक्यातील महसूल विभागाच्या सर्व कामकाजात विधीज्ञ मंडळाचे सदस्य सहभाग घेणार नाही व प्रलंबित प्रकरणे स्थगित ठेवले जातील, असेही निवेदनात नमूद केले आहे.
अॅड. रोहीत राठी तारखेच्या दिवशी न येता अन्य दिवशी आले व मला माझ्या केसमध्ये काय निर्णय दिला, असे माझ्याकडे बोट दाखवित उद्धटपणे विचारल्याने हे प्रकरण वाढले आहे. नियमाचे पालन न केल्यने हे सर्व उपस्थित झाले आहे. अॅड. व्ही.टी. देशपांडे यांनीही नियमांचे पालन न करता वागणूक दिली आहे.
- विजय पवार, तहसीलदार, आर्वी.