युवा पिढीने नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:00 AM2018-03-19T00:00:08+5:302018-03-19T00:00:08+5:30
आजच्या तरुण पिढींनी केवळ नोकरीच्या मागे न लागता कौशल्य हस्तगत करुन स्वयंरोजगार उभारावा. आणि इतरांना स्वयंरोजगारामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आजच्या तरुण पिढींनी केवळ नोकरीच्या मागे न लागता कौशल्य हस्तगत करुन स्वयंरोजगार उभारावा. आणि इतरांना स्वयंरोजगारामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी, असे प्रतिपादन आ.डॉ. पंकज भोयर यांनी आर. जी. भोयर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षण व रोजगार मेळाव्यात केले.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्यावतीने आयोजित मेळाव्यात व्यासपीठावर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उमेश खारोडे, पनवेलच्या एल.अॅन्ड टी. कन्सट्रक्शन स्किल ट्रेनिंग इंन्स्टिटयुटचे प्राचार्य तेजराव पाटील, विशाल रांगणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते.
आ. भोयर पुढे म्हणाले, आपण सुद्धा तुमच्या सारखा आहे. पासपोर्ट फोटोचे कव्हर तयार करुन जिल्ह्यात प्रत्येक फोटो स्टुडिओमध्ये जावून विकण्याचा स्वयंरोजगार आपण केला. तसेच विद्यार्थ्यांनी अमली पदार्थापासून दुर राहुन निरंतर शिस्तिने स्वत:चे ध्येय गाठावे. कौशल्य विकासाची प्रेरणा प्रामुख्याने महात्मा गांधींनी वर्धा जिल्ह्यात प्रथम दिली. वर्धा जिल्हा हा कौशल्य विकासाचा पायोनियर जिल्हा आहे, असे सांगितले.
मेळाव्याच्या माध्यमाने एच. एस. सी. व्होकेशनल अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची तथा रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संधीचे युवकांनी सोनं करुन प्रशिक्षणाचा व रोजगाराचा लाभ घ्यावा असे यावेळी खारोडे यांनी सांगितले. मेळाव्याचा लाभ ५०० च्यावर तरुणांनी घेतला.
कार्यक्रमादरम्यान एल. अॅन्ड टी कंपनीने वय, वजन व अभ्यासक्रम तपासून ३०० युवकांना नियुक्ती पत्र देऊन १ एप्रिल पासुन प्रशिक्षण तथा रोजगाराला हजर राहण्यासाठी कळविले. कार्यक्रमाला प्राचार्य रहमतकर, हांडे, बोरकर, चौधरी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सिमा महाजन यांनी केले तर आभार विशाल रांगणे यांनी मानले.