लाडकी बहीण'चे पैसे मिळाले; पण बँकेने ते परस्पर वळविले !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 05:28 PM2024-08-23T17:28:47+5:302024-08-23T17:30:57+5:30
ओवाळणीवरही डल्ला : संयुक्त बँक खाते असणाऱ्यांना बसला धक्का
लोकमत न्युज नेटवर्क
वर्धा : राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून बहिणींना मोठा दिलासा दिला आहे. रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचा मोबाइलवर संदेश आला. हा संदेश पाहून महिलांनाही आनंद झाला. दुसऱ्या दिवशी बँकेत रक्कम काढायला गेल्या असता ती रक्कम कर्जखात्यात वळती केल्याचे बँक कर्मचाऱ्याने सांगताच बहिणींचा पारा चढला. मुख्यमंत्री भावाने पाठविलेली ओवाळणी बँकेने परस्पर वळती केल्याने महिलांची नाराजी झाली.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी रक्षाबंधनापूर्वीच दोन महिन्यांची तीन हजार रुपयांची ओवाळणी त्यांच्या खात्यात जमा केली आहे. दि. १४ ऑगस्टच्या दुपारपासूनच महिलांच्या मोबाइलवर तीन हजार रुपये जमा झाल्याचा संदेश यायला लागल्याने महिलांचा आनंद गगणात मावेनासा झाला. एकमेकींना फोन करुन विचारणा होऊ लागली. ज्यांचे बँक खाते आधारशी संलग्न होते त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पण, ज्यांचे संलग्न नाही त्यांना प्रतीक्षा करावी लागली. विशेष म्हणजे ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, असा संदेश आला त्या महिला मोठ्या आनंदाने बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या असता ती रक्कम कर्ज खात्यात वळती केल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगताच महिलांचा आनंद औटघटक्याचाच ठरला. कोणतीही विचारपूस न करता पैसे कपात केल्याने रोष व्यक्त होऊ लागला आहे.
महिलांनी बँकाकडे ती रक्कम परत करण्याची मागणी केल्यावरही काही बैंक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून महिलांना परतवून लावले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा संताप वाढत असून आता बँकेने ओवाळणीची रक्कम परत करण्याची मागणी जोर धरत आहे.
एक लाखांवर महिलांना मिळाले 'लाडकी बहीण'चे पैसे
- जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून २ लाख २ हजार ३१४ महिलांनी अर्ज केला असून, त्यापैकी १ लाख ९८ हजार ७११ अर्ज पात्र ठरवून ते लाभाकरिता शासनाकडे पाठविण्यात आले.
- शासनानेही रक्षाबंधनापूर्वीच ओवाळणी पाठवायला सुरुवात केली. तीन हजार रुपयांचे संदेश मोबाइलवर धडकायला सुरुवात झाली आतापर्यंत एक लाखांवर महिलांच्या खात्यात रक्कम झाल्याचा अंदाज आहे.
साडेपाचशे अर्ज नाकारले
जिल्ह्यातून दोन लाखांवर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यातून १ लाख ९८ अर्ज पात्र ठरविण्यात आले असून, २ हजार ४०६ अर्ज अपात्र ठरविले आहे. या अर्जदारांना पुन्हा एक संधी देण्यात आली आहे, तर ५६५ अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे आता बाद झालेल्यांना संधी मिळणार नाही.
विविध कारणांमुळे अनेकींचे पैसे वळविले...
बँकेचे बॅलन्स :
महिला लाभार्थ्यांनी ज्या बँकेचे खाते अर्जासोबत जोडले आहे, त्याच खात्यात रक्कम वळती करण्यात आली. विशेषतः बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सची अट असते. ती पाळल्या गेली नाही तर त्याचे चार्ज वसूल केले जात असून, या ओवाळणीतून तिही रक्कम कपात झाल्याची ओरड आहे.
इतर चार्जेस :
खातेदारांना विविध सुविधा देण्याच्या मोबदल्यात बँकेकडून चार्जेसही आकारलेले जातात. परंतु खातेदार काही कारणास्तव खातं काढतो पण, काम झाल्यावर ते खाते उपयोगात आणत नाही. त्यामुळे अशा खात्यात रक्कम जमा झाल्यावर त्यांनीही कपात केली आहे.
बचत गटाचे कर्ज :
काही महिलांचे पतीसोबत संयुक्त खाते असून, तोच खाते क्रमांक दिला आहे. त्यामुळे पीककर्ज किंवा बचत गटाचे कर्ज थकलेले असल्यामुळे त्या खात्यात रक्कम जमा होताच बँकेने कपात केली. त्यामुळे मुख्यमंत्री भावाने दिलेली ओवाळणी बहिणींच्या कामी आलीच नाही.
"माझ्याकडे बँक ऑफ इंडिया सेलूच्या शाखेतून मुद्रा योजने अंतर्गत घेतलेले कर्ज थकीत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत मला तीन हजार रुपये रक्षाबंधनापूर्वी मिळाले. त्याचा मोबाइलवर संदेशही प्राप्त झाला. परंतु ती तीन हजारांची रक्कम बँकेने परस्पर माझ्या कर्ज खात्यात वळती केली आहे. ती रक्कम परत मिळावी."
- जयश्री शंकदरवार, धानोली (मेघे)
"कर्ज थकीत असल्यास आपोआप बँक सिस्टीमनुसार त्या खात्यातील रक्कम कर्ज खात्यामध्ये वळती होते. असे झाल्यास महिलांनी संबंधित बँक व्यवस्थापकांना अर्ज द्यावा. ती रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये परत केली जाईल. तशा सूचनाही सर्व बँक व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत."
- चेतन शिरभाते, जिल्हा प्रबंधक, अग्रणी बँक.