नफेखोरांना देवळीत मिळतो दिलासा
By admin | Published: June 11, 2017 12:42 AM2017-06-11T00:42:17+5:302017-06-11T00:42:17+5:30
या ना त्या कारणात येथील नाफेडची तूर खरेदी चांगलीच चर्चेत आली आहे. खरेदीच्या प्रारंभीलाच देवळी
तूर खरेदीत अनागोंदी : चुकाऱ्यांकरिता कास्तकारांची पायपीट
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : या ना त्या कारणात येथील नाफेडची तूर खरेदी चांगलीच चर्चेत आली आहे. खरेदीच्या प्रारंभीलाच देवळी परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वत:चे गोदाम नाफेडच्या तूर खरेदीत खाली केले. यामध्ये खऱ्या कास्तकारांना उपेक्षीत ठेवून लाखोंचा मलीदा घश्यात उतरविला. आता पुन्हा नव्याने तालुक्याचे बाहेरील व्यापाऱ्यांचे ट्रक याठिकाणी खाली होत असल्याचे बोलले जात आहे. तूर मोजणारे हमाल सुद्धा व्यापाऱ्यांचेच असल्याने सर्व काही बिन बोभाटपणे सुरू आहे. खवीस पदाधिकाऱ्यांचा यामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग असल्याने या व्यवहारातून खरेदीचे सोपस्कर पूर्ण होत असल्याचा आरोप होत आहे.
आजपावेतो तालुक्यातील देवळी व पुलगाव केंद्रावर नाफेडची ४५ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. यामध्ये देवळी केंद्रावर १८ हजार व पुलगाव केंद्रावर २७ हजार क्विंटलची आवक आहे. या आधी देवळी येथे टोकण दिलेल्या ८४१ कास्तकारांची तूर खरेदी करण्यात आली आहे. आता नव्याने ८४२ ते १ हजार ७४० पर्यंतच्या कास्तकारांना टोकण देण्यात आले असून या सर्वांची ५ जून पासून खरेदी सुरू झाली आहे. यासर्व टोकण धारकात सर्वात जास्त नफाखोर व्यापाऱ्यांचाच भरणा असल्याची चर्चा आहे. जवळच्या कास्तकारांचे सातबारा व आवश्यक कागदपत्रे घेवून हा गोरखधंदा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी काही खवीस पदाधिकाऱ्यांची होत असलेली धावपळ बोलकी ठरत आहे.
नाफेडची तूर खरेदी ९ जूनपर्यंत करण्यात आली. परंतु धनादेश मात्र १९ एप्रिल पर्यंतचे देण्यात येत असल्याने गरजू कास्तकार अडचणीत सापडला आहे. शेतीचा हंगाम सुरू झाल्याने त्याने धनादेशासाठी खरेदी विक्री समितीच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या चकरा सुरू आहे.
देवळी बाजार समितीच्या आवारात खविसच्यावतीने येत असलेल्या धनादेशात व्यापाऱ्यांचाच बोलबाला असल्याचे कास्तकार बोलत आहे. ज्या कास्तकारांच्या नावाने तुरी लावण्यात आल्या अशांचे धनादेश व्यापाऱ्यांच्या घरी पोहचता होत आहे. शासनाने नाफेडच्या माध्यमातून नफाखोर व्यापाऱ्यांची घरे भरली असल्याच्या प्रतिक्रीया आहेत.