स्वस्त धान्याचा काळाबाजार लाभार्थी वंचित
By admin | Published: May 8, 2014 11:55 PM2014-05-08T23:55:35+5:302014-05-08T23:55:35+5:30
तळेगाव (श्या.) : तालुक्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित असल्याचे दिसते.
केशरी कार्डधारक वार्यावर
तळेगाव (श्या.) : तालुक्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित असल्याचे दिसते. महिन्याच्या शेवटी केवळ दोन-तीन दिवसांसाठीच काही धान्य दुकाने सुरू राहत असल्याने नागरिकांना स्वस्तातील धान्य मिळत नाही. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पुरवठा विभागाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतात. यात बीपीएल, अंत्योदय, एपीएल, शुभ्र व अन्नपूर्णा असे शिधापत्रिकांचे प्रकार आहेत; पण निर्धारित वेळेवर गोरगरिब नागरिकांजवळ रोख रक्कम राहत नाही. ही दुकाने महिनाभर सुरू राहिल्यास गोरगरीबांना सवडीनुसार धान्य घेणे शक्य होणार आहे; पण असे होत नाही. बर्याच दुकानांत महिन्याच्या २४-२५ तारखेला धान्य मिळते.
त्यापूर्वी शिधा पत्रिकाधारक गेल्यास सरकारकडून अद्याप धान्य आले नाही, असे सांगितले जाते. काही दुकानांमध्ये हेतूपुरस्सर महिना संपायला २ ते ३ दिवसांचा अवधी असताना धान्यसाठा आणला जातो. याबाबत अन्न सुरक्षा अधिकार्याकडे तक्रारी केल्यास तेही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. यामुळे सदर अधिकार्यावरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे. महिना संपताच धान्य संपल्याचे आणि मागील कोट्याचेही धान्य परत गेल्याचे सांगितले जाते. महिना संपल्यानंतर उर्वरित धान्याचा काळाबाजार केला जातो. आता लग्नसराईचे दिवस असल्याने हे धान्य सर्रास खुल्या बाजारात विकले जात आहे.
शहरातील बहुतेक स्वस्त धान्य दुकानातून धान्य नेल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नसल्याची ओरड होत आहे. महिन्याच्या शेवटी पावत्या लिहून सर्व हिशेब जुळविले जात असल्याची चर्चा नागरिकांत आहे. नागरिकांकडे शिधापत्रिका असताना शासन नियमानुसार शासनाद्वारे जाहीर दराप्रमाणे धान्य मिळणे अनिवार्य आहे. त्या भावात धान्य मिळत नसेल तर शिधापत्रिकांचा उपयोग काय, असा प्रश्न कार्डधारक उपस्थित करीत आहेत. तालुक्यात चार महिन्यांपासून येथील कार्डधारकांना धान्याचा पुरवठा होत नाही. हे धान्य मिळूनही बोगस लाभार्थ्यांच्या नावाने विकले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदळाचा पुरवठा अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना जानेवारी २०१४ पासून केला जात आहे; पण केशरी शिधापत्रिका धारकांना गत ४ महिन्यांत केरोसीनशिवाय कोणत्याच धान्याचा पुरवठा करण्यात आला नाही. याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे.(वार्ताहर)