स्वच्छ भारत अभियानास रिक्त भूखंडधारकांची बगल

By admin | Published: February 5, 2017 12:39 AM2017-02-05T00:39:31+5:302017-02-05T00:39:31+5:30

मोठा गाजावाजा करून केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान राबवित आहे. शहर वा ग्रामीण

Beside the vacant land holders in Swachh Bharat Abhiyan | स्वच्छ भारत अभियानास रिक्त भूखंडधारकांची बगल

स्वच्छ भारत अभियानास रिक्त भूखंडधारकांची बगल

Next

सार्वजनिक आरोग्य धोक्यात : साचलेला कचरा व घाणीमुळे दुर्गंधी
कारंजा (घा.) : मोठा गाजावाजा करून केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान राबवित आहे. शहर वा ग्रामीण स्तरावरील प्रशासनही त्यासाठी प्रयत्नशील आहे. विविध कार्यक्रम घेऊन जनप्रबोधन केले जात आहे; पण सामाजिक कर्तव्याची जाण नसलेल्या अनेक नागरिकांद्वारे या अभियानाला खो दिला जात आहे. जेथे खुली जागा दिसेल, तेथे कचरा टाकणे आमचा हक्क आहे, या भावनेने अनेक नागरिक रिकाम्या भूखंडामध्ये कोरडा व ओला कचरा टाकून आजारांना निमंत्रण देत असल्याचे दिसते.
वॉर्ड क्रमांक ८ मध्ये गुरूकूल कॉन्व्हेंटच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या रिकाम्या भूखंडात आजूबाजूचे नागरिक केरकचरा व घरातील ओला कचरा टाकतात. भूखंड पूर्णत: कचऱ्याने भरून सर्वत्र घाण पसरली आहे. विशेष बाब म्हणजे या भूखंडावर आधी खूप झाडे-झुडपे वाढली होती. बाजूच्या कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना किडे व सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका निर्माण झाला होता. नागरिकांनी नगरपंचायतकडे तक्रार केली. संबंधित मालकांकडून हा भूखंड स्वच्छ करून घ्यावा, अशी विनंती केली; पण मालकाने भूखंडाची झाडे-झुडपे काढून स्वच्छता न करता नगरपंचायतने झाडे-झुडपे काढली. कापलेली झाडे, पाला-पाचोळा, कचरा दोन महिन्यांपासून तेथेच पडून आहे. मालकाच्या निदर्शनास आणूनही मालकाकडून स्वच्छता अभियानाला बगल दिली जात आहे. भूखंड मालकाचा शोध घेऊन नगरपंचायतने समज द्यावा व हा कचरा स्वच्छ करण्यास सांगावे वा नगरपंचायतने या गंभीर बाबीकडे लक्ष देत भूखंड स्वच्छ करावा, अशी मागणी आहे.
शहरातील इतरही अनेक ले-आऊटमध्ये खासगी मालकीचे रिकामे भूखंड आहेत. या भूखंडाचा सर्रास कचरा-कुंडी, कचरा घर म्हणून वापर होत आहे. झाडे-झुडपे वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका निर्माण झाला आहे. भूखंड रिकामा असल्याने कुणीही येथे सहजपणे कचरा टाकतात. घाण पसरते. नगर पंचायत प्रशासनाने या रिकाम्या भूखंड धारकांना नोटीस देत भूखंड स्वच्छ राखण्यास सांगावा. ऐकत नसतील तर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
दररोज केरकचरा टाकण्यासाठी मोठ्या आकाराच्या कचराकुंड्या नगरपंचायतने उपलब्ध करून द्यावात. रिकाम्या प्लॉटवर कचरा टाकणाऱ्यांवर कार्यवाही करावी. खासगी भूखंड संबंधितांकडून स्वच्छ करून घ्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)

‘ओपन स्पेस’वरही कचराच
शहरातील ले-आऊटमध्ये जनतेच्या उपयोगीतेसाठी ‘ओपन स्पेस’ सोडण्यात आले आहे; पण या जागेच्या सभोवताल तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने तारांचे कुंपण केले नव्हते. यामुळे या जागांवर काही ठिकाणी अतिक्रमण तर कुठे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आता शहरात नगरपंचायत अस्तित्वात असल्याने प्रशासनाने या सर्व जागा तारांचे कुंपण करून ताब्यात घ्याव्या. या जागांचे सौंदर्यीकरण व विकास करावा. नगर पंचायत प्रशासनाने या उपाययोजना केल्यास आपोआपच खुल्या जागांवरील अतिक्रमण थांबेल आणि कचऱ्याचे साम्राज्यही कमी होईल, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Beside the vacant land holders in Swachh Bharat Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.