राजस्थानी करतात पाण्याचे उत्कृष्ट नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:56 PM2019-06-15T23:56:45+5:302019-06-15T23:57:27+5:30
माहेश्वरी समाजाचे मूळ राजस्थान असून देशातील विविध प्रांतात तो विखुरलेला आहे. राजस्थानात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठे आहे. असे असतानाही राजस्थानी नागरिक पाण्याचे उत्कृष्ट नियोजन करतात. पुरातन विहिरी, बावडी त्यांचीच देण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : माहेश्वरी समाजाचे मूळ राजस्थान असून देशातील विविध प्रांतात तो विखुरलेला आहे. राजस्थानात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठे आहे. असे असतानाही राजस्थानी नागरिक पाण्याचे उत्कृष्ट नियोजन करतात. पुरातन विहिरी, बावडी त्यांचीच देण आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत प्रत्येकाने पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरवावा, भविष्यातील जलसंकटावर मात करावी, असे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष, जलदूत डॉ. सचिन पावडे यांनी केले.
माहेश्वरी मंडळाद्वारे समाजाच्या ५१५२ व्या वंशोत्पत्ती दिनाच्या औचित्याने जलसंकटावर व्याख्यान, रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
डॉ. पावडे म्हणाले, भूगर्भातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. दुसरीकडे सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक यामुळे पाणी जमिनीत न जिरता थेट वाहून जाते. यामुळेच जलसंकट गडद होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. जलबचतीकरिता जलपुनर्भरणाचे महत्त्व विशद करून प्रत्येकाने याकरिता पुढाकार घ्यावा, असे सांगितले. यावेळी परमानंद तापडिया यांच्या हस्ते डॉ. पावडे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
व्याख्यानापूर्वी लोकेश कुलधरिया, प्रकाश राठी यांच्या संयोजनात आयोजित शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा ओमप्रकाश पसारी, हर्षा टावरी, सूर्यप्रकाश गांधी, दामोदर दरक, मदनलाल मोहता, अमित टावरी, हरीश टावरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नितीन मुंदडा यांच्या नेतृत्वात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यात समाजबांधवांचा मोठा सहभाग होता. यात्रेतून बालकांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. शोभायात्रेदरम्यान ‘जय महेश’च्या घोषणेने आसमंत निनादला होता. महेश रथावर शिवपार्वती विराजमान होते. मंडळाचे समन्वयक राजकुमार जाजू यांनी प्रास्ताविक, तर संचालन गीतेश चांडक यांनी केले. उमेश टावरी यांनी आभार मानले. आयोजनाकरिता संजय टावरी, प्रशांत तापडिया, विनोद राठी, अजय गांधी, चेतन लढ्ढा, अमित गांधी, विजय राठी, दीपा टावरी, दिव्या मोहता, राजेश टावरी, मुकुल भुतडा, ओम केला, आशीष पनपालिया आदींनी सहकार्य केले.