‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:08 PM2018-01-04T22:08:15+5:302018-01-04T22:08:30+5:30
केंद्र शासनाच्या नियोजित कार्यक्रमातील ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपये खात्यात जमा होते, अशी अफवा कुणीतरी पसरविली आणि अर्ज भरण्याची वादळी आणि शिघ्र प्रक्रिया सुरू झाली.
अमोल सोटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : केंद्र शासनाच्या नियोजित कार्यक्रमातील ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपये खात्यात जमा होते, अशी अफवा कुणीतरी पसरविली आणि अर्ज भरण्याची वादळी आणि शिघ्र प्रक्रिया सुरू झाली. तालुका डाकघर कार्यालयात पाच दिवस चांगलीच गर्दी उसळली. पोस्टमास्तर ओरडून ओरडून अशी काहीच योजना नाही, असे सांगत होते. मात्र कुणीही कानावर घेतले नाही. एका आष्टी तालुक्यातून एकूण १५०० मुलींनी अर्ज भरले. यातून पोस्टाला ४५ हजार ७०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. आता पुढे काय ? दोन लाख कधी जमा होणार, या प्रश्नांनी पोस्टातील सबंध कर्मचारी भांबावले आहे.
स्त्रीभ्रुणहत्या नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र तथा राज्य शासन विविध योजना सुरू करत आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती झाली यावर शासन तर सोडाच सामाजिक हितासाठी कार्य करणाऱ्या कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे येरे माझ्या मागल्या, अशी अवस्था पाहायला मिळत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये आष्टी तालुक्यातील अंतोरा येथील एका नागरिकाने बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे दोन मुलींचे खाते काढत अर्ज भरल्याची माहिती इतरांना दिली. एवढेच काय ४० हजार प्रमाणे दोन्ही मुलींच्या खात्यात ८० हजार जमा झाल्याचेही छातीठोक सांगून मोकळे झाले. ही वार्ता तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतच्या हद्दीतील गावागावात पसरली. पालकांनी मुलींना घेऊन पोस्ट कार्यालयात आणले. अर्ज भरण्यासाठी दलालांनी गर्दी हेरून हुशारी मारली. पोस्ट खर्च करीता ४२ रुपये प्रती, साधे टपाल १० रुपये, असे शुल्क आकारण्यात आले.
तालुका पोस्ट मास्तरांनी सर्वांना समजावून सांगितले. वरिष्ठ कार्यालयातून असे अर्ज आले नाही. आदेश नाही, सुचना नाही तरी अर्ज भरणे थांबवा मात्र मुलींचे पालक त्यांनाच दम देत होते. आमचे पैसे जाईल तुम्हाला काय करायचे, असे म्हटल्यावर पोस्ट मास्तर तरी काय करणार! हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सध्यातरी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना बोगस निघाली, असे चित्र आहे.
खोट्या अफवा थांबवा
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेतील खोट्या अफवा पसरविणाऱ्यांनी भोळ्याभाबड्या लोकांना भुलथापा देवू नये. प्रवासाचा खर्च, मजुरी आणि वेळ याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे अशा कुठल्याही योजनांची खोट्या अफवाद्वारे प्रसिद्धी करू नये, असे पोस्ट मास्तरांनी सांगितले.
मुख्याध्यापकांना मनस्ताप
योजनेची अर्ज भरताना तालुक्यातील विविध शाळेच्या मुख्याध्यापकांना बोनाफाईड प्रमाणपत्र देताना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मुली शाळेत शिकत असल्याने त्यांच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून बोनाफाईड सर्टिफिकेट महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे काम सोडून प्रमाणपत्र वाटण्यात आठवडा वाया गेला आहे.
फोटो स्टुडिओ, झेरॉक्समध्ये गर्दी
अर्जाला जोडण्यासाठी झेरॉक्सच्या कॉपी काढायला मोठी गर्दी झाली होती. फोटो स्टुडिओ मध्येही भलीमोठी रांग लागली होती. अर्जंट पासपोर्टचे दरही जास्त आकारण्यात आले होते. शिवाय लिफाफा घेण्यासाठी स्टेशनरी दुकानात गर्दी हारूसफुल होती.