चालकानेच केला विश्वासघात; १७.४२ लाखांचे ३० लॅपटॉप केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 05:00 AM2022-02-17T05:00:00+5:302022-02-17T05:00:07+5:30
चालक मोहम्मद अयुब झाहीर खान (रा. खेलम जागीर बरेली) आणि राजकुमार बुलाडीसिंग (रा. बिरहाना, उत्तरप्रदेश) यांनी एचआर ५५ एडी ९९३९ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये बेंगलोर येथून ७०४ लॅपटॉपचे बॉक्स भरून कंटेनर सीलबंद करून हैदराबाद व दिल्ली येथे जाण्यासाठी निघाले. आरोपी चालक व क्लिनर यांनी १३ बॉक्स हैदराबाद येथील कंपनीत उतरवून पुन्हा सील करून दिल्ली येथे जाण्यासाठी निघाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बेंगलोर येथून लॅपटॉपचे बॉक्स भरून दिल्ली येथे जात असलेल्या कंटेनर चालकासह क्लिनरनेच १७ लाख ४२ हजार २९८ रुपये किमतीचे ३० लॅपटॉप लंपास केले. ही घटना नागपूर ते हैदराबाद मार्गावर दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास दारोडा टोलनाका परिसरात असलेल्या ढाबा परिसरात घडली. या प्रकरणी सतीशकुमार विद्याप्रसाद पांडे यांनी वडनेर पोलिसांत तक्रार दिली आहे.
चालक मोहम्मद अयुब झाहीर खान (रा. खेलम जागीर बरेली) आणि राजकुमार बुलाडीसिंग (रा. बिरहाना, उत्तरप्रदेश) यांनी एचआर ५५ एडी ९९३९ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये बेंगलोर येथून ७०४ लॅपटॉपचे बॉक्स भरून कंटेनर सीलबंद करून हैदराबाद व दिल्ली येथे जाण्यासाठी निघाले. आरोपी चालक व क्लिनर यांनी १३ बॉक्स हैदराबाद येथील कंपनीत उतरवून पुन्हा सील करून दिल्ली येथे जाण्यासाठी निघाले. मात्र, दारोडा टोल नाका परिसरात असलेल्या एका ढाब्यावर दोघेही थांबले असता त्यांना कंटेनरचे सील तुटलेले दिसून आले. याची माहिती त्यांनी सुरक्षा अधिकारी सतीशकुमार यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरची पाहणी केली असता त्यांना १७ लाख ४२ हजार २९८ रुपये किमतीचे ३० लॅपटॉप आणि १० जुने लॅपटॉप असा एकूण १७ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलेला दिसून आला. हा सर्व मुद्देमाल आरोपी चालक आणि क्लिनर यांनी अनोळखी व्यक्तीला परस्पर विक्री केल्याच्या संशयातून सतीशकुमार यांनी वडनेर पोलिसांत तक्रार दिली आहे.