सात सामन्यांत खेळाडूंचे उत्तम प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:16 PM2017-12-30T23:16:28+5:302017-12-30T23:16:39+5:30
न.प. व खो-खो प्रेमी यांच्या सहकार्याने आयोजित पालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय महिला, पुरूष खो-खो सामन्यांचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता झाले. तत्पूर्वी क्रीडा ज्योत मशाल रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : न.प. व खो-खो प्रेमी यांच्या सहकार्याने आयोजित पालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय महिला, पुरूष खो-खो सामन्यांचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता झाले. तत्पूर्वी क्रीडा ज्योत मशाल रॅली काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या सात सामन्यांत खेळाडूंनी खेळाचे उत्तम प्रदर्शन घडविले.
कार्यक्रमाला खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश बकाने, डॉ. शिरीष गोडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीप ठाकुर, माजी नगरसेवक भाटीया, सर्व गटनेते उपस्थित होते. प्रास्ताविक तराळे यांनी करीत आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. आ.डॉ. भोयर यांनी नगर परिषद प्रशासन व आयोजन समितीचे कौतुक करून स्पर्धेकरिता न.प. निधीद्वारे १० लाख रुपयांची तरतूद केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. बकाने व डॉ. गोडे यांनी मार्गदर्शन केले. खा. तडस यांनी क्रीडा क्षेत्राला पुनरवैभव प्राप्त करून देण्यास्तव खो-खो या मैदानी खेळाची स्पर्धा घेतल्याबद्दल नगर परिषद तथा प्रमुख आयोजक माजी खो-खो खेळाडू अतुल तराळे व टीमचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या मातीतील अन्य खेळांच्या स्पर्धाही आयोजित कराव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विदर्भ खो-खो असो.चे सचिव सुधीर निंबाळकर, सहसचिव संजय इंगळे उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रातील माजी खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व पालकांचा क्रीडा जीवनगौरव सन्मानाने सत्कार करण्यात आला. न.प.द्वारे मधुकर बेले, मुरलीधर फाले, मदन तळवेकर, विनोद हांडे, जया बोटकुले, किरण नखाते यांना सन्मानित केले गेले. शुक्रवारी पुरुष, महिला गटातील सात सामने खेळविण्यात आले.
काटोल संघाची आगेकूच
महिला गटात नवजयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ व रामनगर स्पोर्टींग क्लब वर्धा यांच्या सामन्यात नवजयहिंदने डाव व ४ गुणांनी, विदर्भ युवा क्रीडा मंडळ काटोल व चंद्रपूर संघाच्या सामन्यात काटोलने दोन गुणांनी, उदय क्रीडा मंडळ चांदुरबाजार व सहयोग प्रसारक मंडळ वर्धा या पुरूषांच्या सामन्यात उदयने एका गुणाने, विदर्भ युथ काटोल व तुळजाई खल्लार यांच्यातील सामन्यात काटोलने १ गडी व ५.४० मिनिटे राखून, विदर्भ क्रीडा मंडळ काटोल व चंद्रपूर संघाच्या सामन्यात काटोलने डाव व एक गुणाने, तुळजाभवानी परतवाडा व नवमहाराष्ट्र नागपूर यांच्यातील सामना परतवाडाने एक गडी व सहा मिनिटे तर ह्युमॅनिटी स्पोर्टींग क्लब परतवाडा व जयहिंद पचखेडी या महिलांच्या सामन्यात परतवाडा संघाने एक डाव व दोन गुणांनी विजय प्राप्त केला.