वर्ध्यात आयपीएल मॅचवर सट्टा; ६ जुगाऱ्यांना बेड्या, २६ लाखांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 11:40 AM2022-05-05T11:40:21+5:302022-05-05T11:42:48+5:30
पोलिसांनी रात्रीच्या सुमारास फार्महाऊसवर छापा मारला असता, पोलिसांना सहा जुगारी मोबाईल ॲपच्या माध्यमातून क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावताना रंगेहाथ मिळून आले.
वर्धा : नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन या २०-२० क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या जुगार अड्ड्यावर वर्धा पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण विभागाने छापा मारून सहा जुगाऱ्यांना ऑनलाईन सट्टा लावताना रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई सालोड शिवारात असलेल्या फार्महाऊसवर ३ मे रोजी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्यात होमेश्वर वसंत ठमेकर (५०), रा. रामनगर, प्रवेश पुडीलाल चिलेवार (४२), रा. नाचणगाव, अशोक भगवंत ढोबाळे (३२), रा. पुलगाव, गिरीश नामदेव क्षीरसागर (३१), रा. चंद्रपूर, दिनेश नागदेवे (२९), रा. दयालनगर, अविन प्रवीण गेडाम (३०), रा. पुलगाव या जुगाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्याविरुद्ध सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सध्या आयपीएल २०-२० क्रिकेट सामने सुरू असल्याने सट्टा व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात तेजी आलेली आहे. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब, तसेच आदी संघातील खेळाडूंसह संपूर्ण सामना कोण जिंकेल, कोण हारेल, यावरही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टा लावण्यात येतो आहे. सालोड शिवारात होमेश्वर वसंत ठमेकर (५०) रा. रामनगर याचे फार्महाऊस असून, त्या फार्महाऊसवर मागील दोन महिन्यापासून आयपीएलवर सट्टा लावण्याचा प्रकार सुरू होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता पोलिसांनी रात्रीच्या सुमारास फार्महाऊसवर छापा मारला असता, पोलिसांना सहा जुगारी मोबाईल ॲपच्या माध्यमातून क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावताना रंगेहाथ मिळून आले. खोलीत लागून असलेल्या टीव्ही स्क्रीनवरील क्रिकेट मॅचवर ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारा पैशाची बाजी मोबाईलवर लावताना मिळून आले.
पोलिसांनी सहाही जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून टीव्हीचे ३ संच, ३६ मोबाईल, ३ रेकॉर्डर संच, १ डोंगल, २ लॅपटॉप, १ इनव्हर्टर, १ चारचाकी वाहन, ३ दुचाकी, डायरी व इतर नोंदणी केलेले साहित्य आणि ३,५०० रुपये रोख रक्कम, असा एकूण २६ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.