दोन दिवसांत ४०० कोटींचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 09:25 PM2018-05-31T21:25:10+5:302018-05-31T21:25:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वेतन वाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांमधील अधिकारी व कर्मचारी बुधवारपासून दोन दिवसाच्या देशव्यापी संपावर गेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील ५०० वर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. परिणामी, दोन दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ४०० कोटींवर व्यवहार ठप्प झाले आहेत. या संपाचा फटका जिल्ह्यातील बँक खातेदार तथा शेतकऱ्यांना बसला आहे. बँका बंद असल्याने एटीएमचे ट्रान्झेक्शनही प्रभावित झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात शासकीय ३० बँका असून लहान-मोठ्या बँका मिळून १४७ शाखा कार्यरत आहेत. शिवाय नागरिकांना तत्पर सेवा मिळावी म्हणून जिल्ह्यात १७७ एटीएम सुरू करण्यात आलेले आहेत. बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसाचा देशव्यापी संप पुकारल्याने या सर्व बँका तथा गुरूवारी बहुतांश एटीएमचे व्यवहारही ठप्प झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये असलेल्या शासकीय बँकेचे एका दिवसाचे रोखीचे व्यवहार सुमारे ५ कोटी रुपये आहेत. याचा हिशेब केल्यास दोन दिवसांत ३० बँकांच्या माध्यमातून सुमारे ४०० कोटी रुपयांचे व्यवहार प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारपासून बँका बंद असल्याने गुरूवारी जवळपास सर्वच एटीएममधील रोकड संपल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यामुळे एटीएमच्या माध्यमातून होणारे व्यवहारही गुरूवारी ठप्प झाल्याचे दिसून आले. बँका बंद आणि एटीएममध्ये ठणठणाट यामुळे नागरिकांची मात्र दाणादाण होत आहे.
वर्धा शहरातील बँक आॅफ इंडिया, भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र यासह अन्य सरकारी बँकांचे कामकाज ठप्प होते. या संपामुळे ग्राहकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला. ९ युनियनच्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने या संपाची नोटीस दिली होती. या संपामुळे नोकरदार, पेन्शनर, शेतकरी, उद्योग, व्यापार क्षेत्रातील सर्वांनाच फटका बसला. बुधवारी बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध नोंदविला. देशभरातील ५ हजार ५०० शाखांतील कामकाज बंद असल्याची माहिती यावेळी संपकर्त्या कर्मचाºयांनी दिली.
आॅनलाईन ट्रान्झेक्शनचा आधार
मागील काही वर्षांत बँकांच्या आॅनलाईन व्यवहारांवर अधिक भर देण्यात आला आहे. यामुळे बऱ्यांच नागरिक या व्यवहारांना पसंती देताना दिसतात. अधिकृत व्यवहार आॅनलाईनच्या माध्यमातून सुरळीत पार पडत आहेत. रोख रकमेचे काम नसलेल्या नागरिकांनी दोन दिवस धनादेश व रोखीचे व्यवहार टाळून इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींगसह अन्य पर्यायांच्या माध्यमातून देवाण-घेवाण पूर्ण केल्याचे दिसून आले.