फुकट्या प्रवाशांनो सावधान! रोज 250 बसेसची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 05:00 AM2021-09-30T05:00:00+5:302021-09-30T05:00:46+5:30
जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बसेस सोडल्या जात आहेत. कोरोनाबाबतच्या खबरदारीच्या उपाययोेजनांचे पालन करून प्रवाशांची ने-आण सध्या रापम करीत असले तरी, फुकट्या प्रवाशांमुळे मोठा तोटा या विभागाला सोसावा लागतो. हाच तोटा टाळता यावा तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विभागस्तरावर पाच, तर आगारस्तरावर प्रत्येकी एक अशी एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी बससेवा सुरू करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तींंमुळे रापमला तोटा सहन करावा लागतो. याच फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वर्ध्याच्या रापम विभागाने कंबर कसली असून, तब्बल दहा पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून दररोज किमान २५० बसेसची तपासणी केली जात आहे.
जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बसेस सोडल्या जात आहेत. कोरोनाबाबतच्या खबरदारीच्या उपाययोेजनांचे पालन करून प्रवाशांची ने-आण सध्या रापम करीत असले तरी, फुकट्या प्रवाशांमुळे मोठा तोटा या विभागाला सोसावा लागतो. हाच तोटा टाळता यावा तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विभागस्तरावर पाच, तर आगारस्तरावर प्रत्येकी एक अशी एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत. ही दहा पथके प्रत्येक दिवशी किमान २५० बसेसची तपासणी करून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत.
तीन दिवसात १ हजार बसेसची तपासणी
फुकट्या प्रवाशांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कंबर कसली आहे.
जिल्ह्यात सध्या विशेष मोहीम राबवून बसमधील प्रवासी विना तिकीट तर प्रवास करीत नाही ना, याची पडताळणी केली जात आहे.
मागील तीन दिवसात १ हजाराहून अधिक बसेसची तपासणी या दहा पथकांकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपये दंड
मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये विना तिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून त्याने चुकविलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती दंड म्हणून वसूल करण्यात येते. त्यामुळे बसमध्ये चढताच तिकीट काढून त्याचे प्रवास संपेपर्यंत जतन करणे क्रमप्राप्तच आहे.
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत. एका दिवशी किमान २५० बसेसची तपासणी ही पथके करीत आहेत. प्रवाशांनीही बसमध्ये चढताच तिकीट घ्यावे, तसेच प्रवास संपेपर्यंत त्यांच्याजवळील तिकिटाचे जतन करावे.
- विजय धायडे, विभागीय वाहतूक अधिकारी, रा.प.म. वर्धा.