सावधान; आठवडी कोविड पॉझिटिव्हीटी दर ७.५४
By महेश सायखेडे | Published: April 11, 2023 04:30 PM2023-04-11T16:30:20+5:302023-04-11T16:31:22+5:30
मागील आठवड्यात होता ०.९८ दर
वर्धा : हळुहळु का होई ना पण जिल्ह्यात कोविड संसर्ग पुन्हा एकदा आपले डोकेवर काढू पाहत आहे. आगील आठवड्यात जिल्ह्याचा कोविड पॉझिटिव्हीटी दर ०.९८ इतका असतानाच आता त्यात मोठी भर पडत तो चक्क ७.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे.
मागील आठवड्यात म्हणजेच २८ मार्च ते ३ एप्रिल य काळात जिल्ह्यात एकूण ३०७ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी तीन व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ४ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात ३५४ व्यक्तींची कोविड चाचणी केली असता चक्क २६ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याबाबतची नोंद जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागाने घेतली आहे.
'सीएस' ठिम्मच?
जिल्ह्यात कोविड पुन्हा नव्या जोमाने आपले पायमुळे घट्ट करू पाहत आहे. ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रि-सूत्रीचा अवलंब केल्यास कोविड संसर्गाला नक्कीच ब्रेक लावता येत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोविड टेस्ट करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांवर सोपविण्यात आली आहे. पण मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नाममात्र कोविड टेस्ट होत असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांची कार्यप्रणाली ठिम्मच असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
कुठल्या तालुक्यात किती सक्रिय रुग्ण?
वर्धा : ११
आर्वी : ०१
देवळी : ०४
सेलू : ०६
कारंजा : ०१
समुद्रपूर : ०३
सक्रिय रुग्णांची वयोगट निहाय स्थिती
२१ ते ३० : ०६
३१ ते ४० : ०५
४१ ते ५० : ०४
५१ ते ६० : ०४
६१ ते ७० : ०५
७१ ते ८० : ०१
९१ ते ९० : ०१