पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरची अमृता पुजारी पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 23:25 IST2025-01-25T23:23:20+5:302025-01-25T23:25:24+5:30
देवळी येथे राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण

पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरची अमृता पुजारी पराभूत
देवळी (वर्धा) : अतिशय चुरशीच्या लढतीत भाग्यश्री फंड (पुणे जिल्हा) हिने महिला महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविला. उपविजेती अमृता पुजारी (कोल्हापूर) ठरली. ही लढत ४ विरुद्ध २ अशा गुणांनी भाग्यश्रीने जिंकली. दोन्ही मल्लांनी डावपेचांची उधळण केली. बांगडी, पट, ढाग, कलाजंग आदी डाव वापरले. तिसऱ्या स्थानासाठी वेदिका सारने (कोल्हापूर शहर), तर चतुर्थ स्थान ज्योती यादव (जळगाव) यांनी प्राप्त केले.
देवळी येथे महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता, तसेच उपविजेता पदाची लढत रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वेळेत झालेल्या राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील इतर विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृह राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अनिल बोंडे, माजी खासदार रामदास तडस, आमदार राजेश बकाने, आमदार प्रताप अडसड, आमदार सुमित वानखेडे, आमदार यावलकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी. क्रीडा भारती जयपूरचे प्रसाद महानकर, हिंदकेसरी योगेश दोडके आदींच्या हस्ते या स्पर्धेतील वेगवेगळ्या वजनी गटांत प्रथम व द्वितीय ठरलेल्या पहेलवानांचा सुवर्ण व रौप्य पदक देऊन सन्मान करण्यात आला.
शुक्रवारपासून देवळी येथे महिला मल्लांच्या डावपेचांची उधळण झाली. क्रीडाप्रेमींना कुस्तीची मेजवानी मिळाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, पोलिस अधीक्षक अनुराग जैन, उपअधीक्षक राहुल चव्हाण, तहसीलदार समर्थ क्षीरसागर, एसडीओ दीपक कारंडे, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, मुख्याधिकरी विजय आश्रमा, प्रा. नरेंद्र मदनकर, नंदू वैद्य, संजय तिरथकर, मदन चावरे, नाना ढगे, शुभांगी कुर्जेकर, उपअभियंता व्यास, डॉ. दिदावत, डॉ. लांडे यांची उपस्थिती होती.
या महिला कुस्तीपटूंनी मारली बाजी
राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून सुवर्ण व रौप्य पदाच्या मानकरी ठरलेल्या महिला कुस्तीगिरांचा सन्मान करण्यात आला. यात ५० किलो वजनी गटात प्रथम नंदिनी साळोखे (कोल्हापूर जिल्हा), द्वितीय रीया ढेंगे (कोल्हापूर शहर), ५३ किलो वजनी गट प्रथम स्वाती शिंदे (कोल्हापूर जिल्हा), द्वितीय ज्ञानेश्वरी पायगुडे (पुणे शहर), ५५ किलो प्रथम सिद्धी ढमढेरे (पुणे शहर), द्वितीय साक्षी चंदनशिवे (सांगली), ५७ किलो प्रथम तन्वी मगदूम (कोल्हापूर जिल्हा), द्वितीय अश्लेषा बागडी (सोलापूर जिल्हा), ५९ किलो प्रथम धनश्री फंड (अहिल्यानगर), द्वितीय गौरी पाटील (कोल्हापूर शहर), ६२ किलो प्रथम वैष्णवी पाटील (कल्याण), द्वितीय संस्कृती मुमुळे (सांगली), ६५ किलो प्रथम सृष्टी भोसले (कोल्हापूर शहर), द्वितीय सुकन्या मिठारी (कोल्हापूर जिल्हा), ६८ किलो प्रथम शिवानी मेंटकर (कोल्हापूर शहर), द्वितीय शिवांजली शिंदे, ७२ किलो प्रथम वैष्णवी कुशाप्पा (कोल्हापूर शहर), द्वितीय गौरी धोटे (अमरावती) यांचा समावेश आहे.