पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांचे भजन आंदोलन

By admin | Published: June 26, 2016 02:03 AM2016-06-26T02:03:01+5:302016-06-26T02:03:01+5:30

स्थानिक अलाहाबाद बॅँकेच्या व्यवस्थापकाच्या हेकेखोर स्वभावामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहेत.

Bhajan movement of farmers for crop loan | पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांचे भजन आंदोलन

पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांचे भजन आंदोलन

Next

तहसीलदारांकडून चौकशी : शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज मंजूर
विजयगोपाल : स्थानिक अलाहाबाद बॅँकेच्या व्यवस्थापकाच्या हेकेखोर स्वभावामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहेत. पीकर्जाकरिता गेलेल्या शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचे प्रकार येथे घडत असल्याने शेतकऱ्यांनी हातात टाळ घेऊन भजन आंदोलन केले. या आंदोलनाचा धसका घेत शेतकऱ्यांना अवघ्या एका तासात कर्ज मंजूर करण्यात आले.
परिसरातील १६ गावांकरिता एकमेव बँक म्हणून येथील अलाहाबाद बॅँकेची ओळख आहे. या बॅँकेतून १६ गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज दिले जाते; पण गत एक वर्षापासून येथील व्यवस्थापक अभिजीत वानखडे शेतकऱ्यांना अकारण त्रास देत आहेत. या संदर्भात परिसरातील शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना निवेदन देण्यात आले होते. त्या काळात शेतकऱ्यांचा त्रास कमी झाला होता; पण आता पीककर्जाकरिता शेतकऱ्यांची गर्दी वाढत असताना तोच त्रास पुन्हा सुरू झाला होता.
याच काळात तांभा व तळणी (भागवत) येथील दौलत बरडे, श्याम बरडे, जानराव नागपूरे, उमेश ठाकरे या शेतकऱ्यांना व्यवस्थापकाकडून त्रास वाढला. परिणामी, शेतकऱ्यांनी शुक्रवारी हातात टाळ घेत बॅँके समोरच भजन आंदोलन सुरू केले. याची दखल घेत एका तासातच तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी मंडळ अधिकारी राठोड यांना चौकशीसाठी बॅँकेत पाठविले. प्रशासनाने चौकशीचा बडगा उगारताच बँक व्यवस्थापकाने या शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मंजूर केले.
येथील शेतकरी ठाकरे हे गत दोन महिन्यांपासून कर्जाकरिता बँकेत चकरा मारत होते. त्यांना ओलिताची सोय असलेला जमानतदार आणाल, तरच कर्ज मिळेल, असे सांगण्यात आले होते. सदर शेतकऱ्याने याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांना देताच त्यांनाही त्वरित कर्ज मंजूर करण्यात आले. इतर शेतकऱ्यांचेही कर्ज लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आंदोलनामुळे कर्जाचा मार्ग मोकळा झाला.(वार्ताहर)

Web Title: Bhajan movement of farmers for crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.