भाव पडल्याने वाटली वांगी
By admin | Published: July 1, 2017 12:31 AM2017-07-01T00:31:33+5:302017-07-01T00:31:33+5:30
तालुक्यातील वाबगाव येथील सुगत नारायणे या कास्तकाराने देवळीच्या शुक्रवारी बाजारात मोफत वांग्याचे दुकान लावून प्रशासनाचे लक्ष वेधले.
शासनाचा निषेध : वाबगावच्या पदवीधर कास्तकारांची व्यथा
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तालुक्यातील वाबगाव येथील सुगत नारायणे या कास्तकाराने देवळीच्या शुक्रवारी बाजारात मोफत वांग्याचे दुकान लावून प्रशासनाचे लक्ष वेधले. वांगे तोडण्यासाठी लागलेली मजुरी व वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने या कास्तकाराने मेटॅडोर भरून आणलेली वांगी मोफत वाटली. वारे अच्छे दिन, खाओ गरीबो, अशाप्रकारे व्यथीत अंतकरणाने ओरडून हा कास्तकार शासनाच्या धोरणाचे वाभाडे काढीत होता. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नसल्याची व्यथा म्हणून उपस्थितांसाठी हा क्षण बोलका ठरला.
शेतमालाच्या भावाअभावी कास्तकार अडचणीत सापडला आहे. शेतीविषयीच्या धोरणाच्या बदलासाठी शासन तयार होत नसल्याने कास्तकारांची केविलवाणी परिस्थिती झाली आहे. कला शाखेत पदवीधर व अल्पभूधारक असलेल्या वाबगावच्या कास्तकाराने शेतमालाचे केलेले दान शासनाचे डोळयात अंजन घालणारे ठरले आहे.
नारायणे हा पाच एकराचा कास्तकार असून बागायती शेतीवर त्याच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह आहे. पदवी घेतल्यानंतर त्याने वडिलोपार्जित शेतीला वाहुन घेतले. हळद, वांगी व इतर पिकांना चालना देवून बऱ्यापैकी उत्पन्न घेण्याऱ्यांमध्ये त्यांचे नाव आहे. परंतु गत काही दिवसात शेतमालाच्या भावबाजीच्या लहरीपणामुळे ते पूर्णत: कोलमडले आहे.
यावर्षी पाच एकर शेतातील दीड एकरात वांगी व साडे तीन एकरात कपाशीचे पीक घेण्यात आले. कॅश क्राप म्हणून वांगीचे पीक भरभरून आले. यावर दीड लाखांचा खर्च करण्यात आला. दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न होण्याच्या लालसेने पिकाची जोपासना करण्यात आली; परंतु भावबाजीमुळे या उत्पादनाचे ४० हजार सुद्धा हाती येण्याची चिन्हे नसल्याने हा कास्तकार हताश झाला.
वांग्याची तोडणी व वाहतुकीसाठी चार हजाराचा खर्च करुन या कास्तकाराने वांग्याची ५५ पोती वर्धा बाजारात नेली. परंतु त्याचे हाती २ हजार ५०० रुपयांचा चुकारा आला. त्यामुळे डोके फिरलेल्या या कास्तकाराने एक मेटॅडोर वांगी देवळीच्या बाजारात आणून फुकटात वाटून दिली.