भरधाव बस चिखलात फसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:20 PM2019-07-31T23:20:34+5:302019-07-31T23:21:13+5:30
तळेगाव, आष्टी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेली रापमची बस खड्डा चूकविण्याच्या नादात चालकाने रस्त्याच्या कडेला उतरविली. बघता-बघता ही बस रस्त्याच्या काठावर फसली. यात ४० विद्यार्थी सुदैवाने बचावले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद): तळेगाव, आष्टी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेली रापमची बस खड्डा चूकविण्याच्या नादात चालकाने रस्त्याच्या कडेला उतरविली. बघता-बघता ही बस रस्त्याच्या काठावर फसली. यात ४० विद्यार्थी सुदैवाने बचावले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. आॅटो बोलावून सर्व विद्यार्थ्यांना आष्टीला आणून विद्यालयात सोडण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी ११ वाजता वरूड डेपोची एम. एच. ४० वाय. ५१०३ क्रमांकाची बस आर्वी येथून आष्टी मार्ग वरूडला जाण्यासाठी निघाली. या बसमध्ये तळेगाववरून ४० विद्यार्थी आष्टीला येण्यासाठी चढले होते. रस्त्याच्या बाजूला वळणमार्ग तयार केला होता. यावर मुरूम टाकण्यात आला. त्या मुरूमाची दबाई केली नाही. त्यामुळे चिखल तयार झाला. त्याचा परिणाम म्हणून वाहन फसत आहेत. अशातच रापमची ही बस पुढील प्रवासाकरिता याच परिसरातून गेली असता ती फसली. बस फसल्याचे लक्षात येताच चालकानेही बस थांबविली. त्यानंतर विद्यार्थ्यांना बस खाली उतरविण्यात आले. वाहनचालकाने बरेच प्रयत्न केले; पण बस सरकत नव्हती. याची माहिती आष्टी पोलीस ठाण्यात व तळेगाव आगाराला देण्यात आली. त्यानंतर आॅटो बोलावून विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यात आले.