भोंदू शंकर बाबाचा केला भंडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:13 PM2018-09-17T23:13:14+5:302018-09-17T23:13:38+5:30
असाध्य आजार दुरस्तीचा दावा करणाऱ्या तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील भोंदू शंकर बाबाचा भंडाफोड अ.भा. अंनिस व काही जागरूक तरुणांच्या पुढाकाराने करण्यात आला आहे. या भोंदू बाबा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : असाध्य आजार दुरस्तीचा दावा करणाऱ्या तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील भोंदू शंकर बाबाचा भंडाफोड अ.भा. अंनिस व काही जागरूक तरुणांच्या पुढाकाराने करण्यात आला आहे. या भोंदू बाबा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे.
शंकर वरघणे उर्फ शंकर बाबा याने करणी उतरवण्यासाठी दहा हजाराची मागणी करुन न दिल्यास दैवीशक्तीने मुठ मारून जीवे मारण्याची धमकी एकाला दिली होती. या भोंदू बाबाच्या भोंदूगिरीची माहिती काही सुजान तरुणांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली. त्यानंतर पोलिसांच्या सहकार्याने या बाबाचा भंडाफोड करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शंकर वरघणे वरोरा तालुक्यातील लाडकी (नागरी) येथील रहिवाशी आहे. तेथील नागरिकांनी त्याच्या भोंदूगिरीला त्रासून त्यास हाकलून लावल्याने सहा वर्षांपूर्वी तो समुद्रपूर तालुक्यातील वायगांव (हळद्या) येथील जयश्री धानोरकर या भक्ताच्या घरी दरबार भरवायचा. गावातील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने त्याला ग्रामस्थांनी गावाबाहेर हाकलले.
दोन वर्षांपासून तो गावाबाहेर झोपडी उभारून दरबार भरवीत होता. दररोज शेकडो भक्त त्याच्याकडे उपचारासाठी येत होते. देणगी रुपाने प्राप्त लाखो रुपयाची माया त्याने गोळा केली होती. गंगाधर कळमकर प्रकृती अस्वस्त वाटत असल्याने सदर बाबाकडे गेला. त्यावेळी बाबाने गंगाधरला तुझ्यावर कुणीतरी करणी केल्याचे सांगीतले तसेच उपचारासाठी बाहेरून मांत्रिक बोलावण्यास दहा हजार लागतील असे सांगितले. दोन दिवसांनी गंगाधरयाने पुन्हा दरबारात जावून पैसे नसल्याचे सांगीतले. हे ऐकताच बाबा त्याच्याशी जोरजोरात भांडू लागला. इतकेच नव्हे तर दैवी शक्ती असल्याचे सांगूण मंत्राने मुठ तुला मारून टाकील अशी धमकी दिली. या घटनेनंतर मांत्रिक त्याच्या उपचारासाठी आलेल्या भक्तांना गंगाधर त्यांच्यावर जादूटोणा करतो असे सांगून त्यांना भडकावयाचा. मग भक्त त्याच्याशी भांडूण मारण्याचा प्रयत्न करायचे. याच त्रासाला कंटाळून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे तक्रार करण्यात आली.
त्यानंतर समितीचे प्रफुल कुडे व संजित ढोके यांनी अधिकची माहिती घेण्यासाठी ओळख न दाखवता गावातील तरुणांसह शंकरबाबाच्या दरबारात प्रवेश मिळविला. तेथे सदर भोंदू बाबाने दैवी शक्ती असल्याचा व ब्लड कॅन्सर सारखे आजार दूरुस्त केल्याचा दावा केला. संपूर्ण मुलाखतीची तीस मिनिटाची मोबाईलचित्रफीत बनविण्यात आली. सदर मांत्रिक भोंदू असल्याची खात्री पटल्यानंतर जिल्हा संघटक पंकज वंजारे, जिल्हा सहसंघटक आकाश जयस्वाल यांच्या मदतीने गंगाधर कळमकरची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पराडकर, उपनिरीक्षक माधूरी गायकवाड, संतोष जैस्वाल, आशीष गेडाम, वीरेंद्र कांबळे, विनायक गोडे, विनायक खेकरे, सचिन रोकडे, रवी वर्मा यांनी ही कारवाई केली.
विविध साहित्य केले जप्त
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शंकर बाबाच्या घरातून लोकांना भूलथापा देण्यासाठी वापरण्यात येणारे, धागे, बिबे, झाडांची मुळ, हाडे, मृत विंचू, देशी-विदेशी दारूच्या शिश्या, सौंदर्यप्रसाधनाचे साहित्य यासह रोख १३ हजार ५०० रुपये रोख जप्त केली आहे. उल्लेखनिय म्हणजे दहावी नापास असलेला हा भोंदू बाबा अनेकांना उल्लू बनवित होता.