भोसलेकालीन वैभवाचे होणार जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:14 PM2019-01-02T21:14:36+5:302019-01-02T21:16:31+5:30
जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नाचणगावात भोसलेकालीन ४०० वर्षापूर्वीचा किल्लावजा सराय पडण्यांच्या मार्गावर असताना राज्य शासनाने या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी २ कोटी ७० लाख रूपयाचा निधी मंजूर करून भग्नावस्थेत असलेल्या या वैभवाच्या बांधकामाचा प्रारंभ केला आहे.
प्रभाकर शहाकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नाचणगावात भोसलेकालीन ४०० वर्षापूर्वीचा किल्लावजा सराय पडण्यांच्या मार्गावर असताना राज्य शासनाने या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी २ कोटी ७० लाख रूपयाचा निधी मंजूर करून भग्नावस्थेत असलेल्या या वैभवाच्या बांधकामाचा प्रारंभ केला आहे.
नाचणगावचे ४०० वर्षापूर्वीचे भोसले कालीन वैभव पहाता तसेच परिसरातील विरूळची व बोरगाव (धांदे) येथील ऐतिहासीक गढी चिंचोली झाडगाव येथील स्व. फत्तेसिंगराव मोरे यांचा ऐतिहासीक वाडा लगतचे भोसलेकालीन भवानी मंदिरं व वर्धा नदी काठचे शिवमंदिर कोटेश्वर देवस्थान ही ऐतिहासीक स्थळे आजही त्या भोसले कालीन स्मरण करून देतात.
नाचणगाव बाजार चौकात जवळपास २०० बाय २०० चौरस फुटाची ही प्राचीन वास्तू आहे. तिचा उपयोग भोसले काळात घोडपात्र व सैनिकांच्या मुक्कामासाठी होत असावा. चुना व रेतीचा वापर करून मजबूत व कलात्मक बांधकामाचा नमूना असलेल्या या भोसले कालीन सराईत कलात्मक कमानीच्या आकाराच्या २१ खोल्या असून मध्यभागी काळा दगडांनी बांधकाम केलेली पक्की प्राचीन विहिर आहे. २५ फुट रूंद व ७४ फुट खोली असलेल्या या विहिरीला पायऱ्या असून विहिरीच्या आत सैनिकांना बसण्यासाठी कप्पे आहेत.
या वास्तूत उत्तरेकडील भागात सैनिकांच्या विश्रामासाठी काही खोल्या आहे. कमानीच्या आकाराच्या या खोल्याची बरीच पडझड झाली आहे. तर पश्चिमेकडील भागातील घोडपात्र वजा खोल्या व संरक्षक भिंत पूर्णत: नेस्तनाभूत झाल्या आहेत. दगडांनी बांधलेली विहिर मात्र ४०० वर्षानंतरही सही सलामत आहे. या वास्तूचे मुख्यद्वार उत्तरेकडे असून या प्रवेश द्वारालगत द्वारपालपसाठी दोन छोटे कप्पे आहेत तर दक्षिण भागाकडील प्रवेशद्वार मात्र भग्नावस्थेत आहे. ही ऐतिहासीक वास्तू दादाशाह नामक सुभेदाराने बांधली असावी असे शिलालेखावरून दिसून येते. ४०० वर्षापूर्वीचा हा शिलालेख देखील भिंतीच्या पडझडीत दडला असावा.
१९७३ ते १९९६ म्हणजेच २३ वर्षे या सराईचा मालकी हक्काचा वाद न्यायप्रविष्ट होता. अखेरीस १९९६ मध्ये न्यायालयाने ही प्राचीन वास्तू नाचणगाव ग्राम पंचायतकडे सोपविली. चार शतकाचा इतिहास सांगणाºया कलात्मक बांधकामाचा उत्कृष्ठ असलेल्या या ऐतिहासीक वास्तूचे जतन व्हावे यास्तव ग्रामपंचायतने प्रयत्न सुरू केले. इतकेच नव्हे राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहालये संचालनालयाच्या अनेक अधिकाºयांनी या वास्तूला भेट देवून पाहणी देखील केली. ही सराय राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषीत करण्याची मागणीही राज्य शासनाकडे अनेक मंडळींनी केली. परंतु राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही वैभवशाली संपदा नामशेष होण्याच्या मार्गावर येवून अनेक भागाची पडझड झाली. परंतु मागील दोन वर्षात भाजपा खासदार रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, जि.प. सदस्य प्रविण सावरकर, पं.स. सदस्य किशोर गव्हाळकर, दिलीप अग्रवाल यांनी बराच पाठपुरावा केला. शिवाय राज्यमंत्री मदन येरावार यांचा या ग्रामीण भागाशी असलेले संबंध पहाता यांनी या भोसले कालीन वैभवाचे जतन व्हावे म्हणून राज्य शासनाकडून २.७० कोटी रूपयाचा निधी मंजूर करून बांधकामाचा प्रारंभही केला.
जिल्ह्यातील या भोसलेकालीन वैभवाचे जतन करून ऐतिहासिक वास्तूचे जतन करून येणाºया नवीन पिढीस भोसलेकालीन इतिहासाची माहिती व्हावी असा आमचा प्रयत्न असल्याचे नाचणगावचे जि.प.सदस्य प्रविण सावरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
असा आहे बांधकाम आराखडा
पहिल्या टप्प्यात पश्चिमेकडील पडलेली संरक्षक भिंत बांधण्यात आली असून या भिंतीला ठिकठिकाणी कमानीचा आकार देवून त्यांना कलात्मिक ऐतिहासीक देखावे कोरण्यात येणार आहे. याशिवाय काही पौराणिक देखावे कोरण्यात येणार आहे. शिवाय या किल्लेवजा सराय मधील मुख्य प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूकडील कमान असलेल्या खोल्यांचेही नविनीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय सरायचे जुने बांधकाम व विहिर सोडून असलेल्या मोकळ्या जागेत मुख्य प्रवेशद्वाराच्या अ भागात बैठके व्यवस्था, ब भागात मोकळी जागा, क भागात लहान मुलांसाठी बालोद्यान व ड भागात खुली व्यायाम शाळा राहणार आहे. तर सभोवताल पेव्हींग ब्लॉकचा रस्ता राहणार आहे. तर सभोवतालच्या भिंतीवर ऐतिहासीक देखावे कोरण्यात येणार आहे. याशिवाय या भोसलेकालीन ऐतिहासीक वैभवात विद्युत व पाणी पुरवठा योजनाही राहणार आहे.याशिवाय ४०० वर्षापूर्वीच्या प्रवेशद्वाराची देखील लाखो रूपये खर्चून कायापालट करण्याचे काम सध्या सुरू आहे.