सहा वर्षांनंतर सायकली व मशीनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:43 PM2018-07-28T23:43:55+5:302018-07-28T23:44:55+5:30
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून सन २०१२-१३ मध्ये विद्यार्थिनींसाठी असलेल्या सायकलीचे वाटप तब्बल सहा वर्षांनंतर स्थानिक पंचायत समितीमार्फत शुक्रवारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून सन २०१२-१३ मध्ये विद्यार्थिनींसाठी असलेल्या सायकलीचे वाटप तब्बल सहा वर्षांनंतर स्थानिक पंचायत समितीमार्फत शुक्रवारी करण्यात आले. या पंचायत समितीमध्ये सध्या साहित्य वाटपाच्या लेटलतीफिचा मुद्दा अत्यंत चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वीही लाभार्थ्यांना दहा वर्षे जुने साहित्य वाटण्यात आले.
सन २०१२-१३ ते २०१६-१७ ग्रामीण भागातील महिलांना शिवण यंत्र, सौरकंदील पुरविणे तसेच मुलींना लेडीज सायकल पुरविणे या योजनेअंर्गत शिल्लक असलेले साहित्य नवीन लाभार्थ्यांना मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. पंचायत समिती समुद्रपूरस्तरावर महिला व बालकल्याण विभागाचे शिल्लक असलेले साहित्य वाटप करण्याबाबत सर्वसाधारण सभेत २४ मे २०१८ ला ठराव महिला बालकल्याण समितीने मंजूर केला. तसेच सौर कंदील व शिलाई मशिन लाभार्थ्यांकडून १० टक्के हिस्सा रक्कम जमा करून वाटण्याबाबत आदेश देण्यात आले. त्यानुसार हे साहित्य २७ जुलै रोजी देण्यात आले. पाच वर्षांपासून आलेले साहित्य इतक्या विलंबाने वाटप करण्याचे कारण काय? असा प्रश्न लाभार्थ्यांनाही पडला आहे. अनेक लाभार्थ्यांना जंगलेल्या सायकली, मशिनी वितरीत करण्यात आल्या.
सौर कंदीलाचे सर्वाधिक लाभार्थी
एकूण आठ लाभार्थ्यांना लेडीज सायकल देण्यात आल्या. तसेच ३७ लाभार्थ्यांना सौर कंदील वितरीत करण्यात आले. तर १७ लाभार्थ्यांना शिलाई मशिन वितरीत करण्यात आली. यामध्ये एस.टी. एस.सी. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी असून या लाभार्थ्यांना ज्या वस्तू वितरीत करण्यात आल्या. त्या मागील सहा वर्षांपासून पंचायत समितीत पडून होत्या. त्यामुळे त्या साफ करून गावाकडे त्यांना न्याव्या लागल्या.
२०१२-१३ या कालावधीत मंजूर झालेले साहित्य वाटप करण्यात त्या वेळीचे जि.प. सदस्य व अधिकारी यांनी संगणमत करून लाभार्थ्यांना पाच वर्ष साहित्यापासून वंचित राहिले. याबाबत संबंधितावर कार्यवाही होणे गरजेचे आहे.
रोशन चौके,
जि.प. सदस्य, कोरा सर्कल
प्रशासन झोपले होते का ? लाभार्थ्यांचा सवाल
पाच ते दहा वर्षांपासून पंचायत समितीत साहित्य पडून होते. लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम केल्यानंतर लाभार्थ्यांना ते वितरीत करणे पंचायत समितीचे काम आहे. येथे मात्र समाजकल्याण विभागाच्या योजनांचे साहित्य १० वर्षांनंतर वितरित केल्याचा प्रकार घडला. आता पुन्हा महिला बाल कल्याण विभागाचे साहित्यही सहा वर्षांनंतर वाटप करण्यात आले. गोदामात असलेल्या या साहित्याची माहिती जि.प. व पं.स.च्या प्रशासनाला नव्हती का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भंगार साहित्य लाभार्थ्यांना वितरीत करणाऱ्या अधिकाºयांवर कारवाई व्हायलाच हवी. ज्या मुलींना सायकली मिळाल्या त्यांना कापडाने पुसून त्या न्याव्या लागल्या. आईवडील सोबत होते. सायकलची अवस्था पाहिल्यावर त्याच्याही भावना तीव्र होत्या. एवढ दिवस विलंब का असा सवाल त्यांनी केला.