लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बिडकर महाविद्यालयात धाड
By admin | Published: June 26, 2016 02:04 AM2016-06-26T02:04:32+5:302016-06-26T02:04:32+5:30
स्थानिक रा.सु. बिडकर महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी शुल्क घेऊन
रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरूच : कार्यवाहीबाबत कमालीची गुप्तता
हिंगणघाट : स्थानिक रा.सु. बिडकर महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी शुल्क घेऊन पावती देत नसल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्धा कार्यालयाच्या चमूने महाविद्यालयावर शनिवारी सकाळी धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरूच होती. कार्यवाहीत कमालीची गुप्तता बाळगली जात असल्याने नेमकी कोणती कार्यवाही करण्यात येत आहे, याबाबत कळू शकले नाही.
प्राप्त माहितीनुसार, या विद्यालयाला १२० जागांसाठी बी.एस.सी. प्रथम वर्षाकरिता परवानगी आहे. नियमित प्रवेश शुल्क ३१० रुपये आकारण्यात येते; पण विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त पाच हजार रुपयांची मागणी होत असल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने लाचलुचपत शाखेकडे केल्याने ही कारवाई झाल्याची चर्चा आहे.
या संदर्भात विद्यार्थ्यांचे बयाण तसेच कागदपत्रे व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत राऊत यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देण्यास त्यांच्याकडून नकार देण्यात येत आहे. यामुळे या कारवाईत नेमके काय, याची माहिती कळू शकली नाही.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चमू सकाळपासून सायंकाळपर्यंत केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगत होती. यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रकार होत असल्याची चर्चाही महाविद्यालयाच्या आवारात होती.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, हवालदार संजय खल्लारकर, महिला पोलीस शिपाई रागिनी हिवाळे, अनुप राऊत, पल्लवी बोबडे, श्रीधर उईके यांचा समावेश आहे.(तालुका प्रतिनिधी)