यंदा सगळ्या नववधूंसमोर उभी आहे 'ही' मोठ्ठी अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 04:04 PM2020-07-04T16:04:16+5:302020-07-04T16:22:28+5:30
यंदा गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नववधूंना यंदा गुरूपौर्णिमेला आपल्या माहेरी येता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मार्च महिन्यांपासून साधारणत: विवाह समारंभाला सुरुवात होते. जुलै महिन्यात गुरूपौर्णिमा (आखाडीला) नववधू माहेरी येतात. परंतु यंदा गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नववधूंना यंदा गुरूपौर्णिमेला आपल्या माहेरी येता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे माहेरपण यावेळी हिरावले गेले आहे.
विदर्भात मार्च ते मे हा लग्नसोहळ्यांचा मोठा हंगाम असतो. यावर्षी याच काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने लग्नसमारंभही अडचणीत आले. अशा स्थितीत ग्रामीण व शहरी भागात ५ ते ६ लोकांच्या साक्षीने कौटुंबिक सोहळे उरकविण्यात आले. वर्धा जिल्ह्यात साधारणत: २ हजार लग्न सोहळे याच पध्दतीने पार पडले आहे. याबाबत प्रशासनाची परवानगीही घेण्यात आली. अनेक लग्नसोहळे बाहेर जिल्ह्यात झाले व त्या नववधू सध्या येथे दाखल आहेत. बाहेर जिल्ह्यातील नववधूंना यावर्षी गुरूपोर्णिमेला माहेरी जाणे शक्य होणार नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाबंदी अजूनही हटलेली नाही. त्यामुळे जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रशासनाकडून ई-पास घ्यावी लागते. ई-पास घेणारे बाहेर जिल्ह्यात गेल्यास त्यांना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्याशिवाय त्यांना येथे येता येणार नाही. या साऱ्या अटी-शर्तीच्या आधारावर नववधूंना आणण्यासाठी माहेरून ही कुणीही जाण्यास धजावत नाही. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात ज्या नववधू आहेत. त्यांना घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य रवाना झाले आहेत. बऱ्याच नववधू लग्न सोहळ्यानंतर नवऱ्याच्या नोकरीच्या गावीही रवाना झाल्या आहेत. पुणे, मुंबई या भागासह राज्याच्या अनेक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठा असल्याने अशा ठिकाणी जाणे धोक्याचे असल्यामुळे त्यांना माहेरील मंडळीही मुलीली घरी आणण्याच्या भानगडीत पडलेले नाहीत. त्यामुळे अनेक नववधू यंदा आखाडीला माहेरी दाखल झालेल्या नाहीत.
जिल्ह्यातील वधू करेल गुरुपौर्णिमा साजरी
ज्यांचे लग्न यावर्षी लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातच झाले, त्या नववधूंना गुरूपौर्णिमेला माहेरी येणे शक्य होणार आहे. त्यांच्या पालकांनी मुलीला माहेर आणण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाठविले आहे. मात्र, जिल्ह्याबाहेर ज्या नववधू लग्न होऊन गेल्या त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय सोपस्कर करून घरी आणणे अनेकांना शक्य नाही. ग्रामीण भागात बहुतांशी नागरिकांना ऑनलाईन परवानगीची प्रक्रियाही करता येत नाही. त्यामुळे मुलीला गुरूपौर्णिमेसाठी आणता आले नाही, याची खंत त्यांना आहे.
लग्नानंतर मुलगा व सूनबाई दोघेही पुण्याला निघून गेले आहेत. कोरोनाच्या साथीत पुण्यावरून गुरूपौर्र्णिमेसाठी येणे शक्य नसल्याने पुण्यातच गुरूपौर्णिमा साजरी करण्याचा सल्ला आम्ही त्यांना दिला. त्यामुळे सुनेचे माहेरी येणे शक्य होणार नाही.
- अविनाश कामडे, म्हाडा कॉलनी.