पतंगाचा मांजा ठरला २० टाक्यांसाठी कारणीभूत; दुचाकीचालकाचा गळा अन् हाताची बोटे चिरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 02:06 PM2022-12-07T14:06:11+5:302022-12-07T14:13:24+5:30
मांजामुळे अपघात
सेलू (वर्धा) :पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने दुचाकीचालकास गंभीर दुखापत झाल्याची घटना काल सायंकाळी स्थानिक पोलिस स्टेशनजवळ घडली. चेतन नामदेव बगवे (३५, रा. घोराड) असे जखमीचे नाव असून त्याला तब्बल २० टाके लावावे लागल्याचे सांगण्यात आले.
घोराड येथील चेतन बगवे हे सेलूतील आदित्य अनघा बँकेत कार्यरत आहेत. सोमवारी ते सायंकाळच्या सुमारास शेतातील उभ्या पिकांची नासाडी करणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करता यावा या हेतूने फटाके खरेदीसाठी गेले होते. फटाके खरेदीनंतर ते शहरातील मेडिकल चौकातून यशवंत महाविद्यालयाकडे दुचाकीने जात होते. दुचाकी पोलिस स्टेशनजवळ आली असता अचानक त्यांच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकला.
चालत्या गाडीवर नियंत्रण मिळवित त्यांनी तो हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न केला; पण यात त्यांच्या हाताच्या तीन बोटांना तसेच गळ्याला गंभीर दुखापत झाली. पतंगाच्या मांजामुळे चेतन यांना दुखापत झाल्याचे लक्षात येताच गणेश कायरकर यांनी जखमीला तातडीने सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्या गळ्याला नऊ तर तीन बोटांना अकरा असे एकूण २० टाके लावण्यात आल्याचे सांगण्यात आले.