पूजेसाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ‘चेन’ जबरीने केली ‘स्नॅच’; धुनिवाले मठ परिसरात खळबळ
By चैतन्य जोशी | Published: October 1, 2022 04:51 PM2022-10-01T16:51:14+5:302022-10-01T16:53:42+5:30
शहर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु
वर्धा : सध्या सण उत्सवांचे दिवस सुरु असल्याने बाजार परिसरात चांगलीच गर्दी उसळली आहे. सर्व पोलीस सण उत्सवादरम्यान बंदोबस्तावर असतानाच शहरालगतच्या धुनिवाले मठ परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरील दोन चोरट्यांनी जबरीने हिसकावून धूम ठोकली.
ही घटना ३० रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. निर्मला हरिभाऊ तळवेकर (६७) रा. मोहन नगर नागपूर रोड ही धुनिवाले मठात असलेल्या मंदिरात पूजा करण्यासाठी काही महिलांसह सायंकाळी ६.४५ वाजताच्या दरम्यान पायदळ जात होती. दरम्यान दोन व्यक्ती तोंडाला दुपट्टा बांधून रस्त्याकडेला थांबून होते.
महिला त्यांच्या जवळ जाताच दुचाकीवर मागे बसून असलेल्या चोरट्याने महिलेशी झटपट करुन गळ्यातील १० ग्रॅम वजनाचा २६ हजार ५०० रुपयांचा सोन्याचा गोफ जबरीने हिसकावून पळ काढला. महिलेने आरडाओरड केली असता परिसरातील नागरिक गोळा झाले. अखेर महिलेने याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आरोपी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शोध सुरु करण्यात आल्याची माहिती दिली.
पोलिसांची गस्त ठरतेय निष्फळ...
सण उत्सवांचा काळ असल्याने पोलिसांकडून गस्त घालण्याची मागणी सातत्याने केली जाते. वरिष्ठांकडून बंदोबस्तही लावल्या जातो. मात्र, काही कर्मचारी केवळ बंदोबस्ताच्या नावावर वेळ काढत असल्याने अशा घटना घडत असल्याचे अनेकदा पुढे आले आहे. त्यामुळे वरिष्ठांनी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.