वीज कनेक्शन येण्याआधी बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:08 PM2018-08-12T22:08:30+5:302018-08-12T22:09:01+5:30
नवीन बांधकाम करण्यात आलेल्या राहत्या घरात विद्युत पुरवठा होण्याच्या आधीच ग्राहकाचे हाती ८२० रुपयांचे देयक देण्यात आले. महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणातून हा प्रकार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : नवीन बांधकाम करण्यात आलेल्या राहत्या घरात विद्युत पुरवठा होण्याच्या आधीच ग्राहकाचे हाती ८२० रुपयांचे देयक देण्यात आले. महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणातून हा प्रकार घडला. स्थानिक चंदा वामन मोहेकर यांनी त्यांच्या राहत्या घरी विद्युत पुरवठा मिळण्याकरिता महावितरणकडे अर्ज केला. ग्राहकाचे मागणीनुसार महावितरणच्या शाखा अभियंत्यानी घराची पाहणी करू एक हजार ५८३ रुपयांची डिमांड नोट मोहेकर यांना दिली. त्यानुसार २६ जून रोजी डिमांड नोटचा भरणा बँकेत करण्यात आला. वायरमनने सांगितल्याप्रमाणे या ग्राहकाने घरातील सर्व्हीस वायर, एलसीबी, अर्थिग आदी बाबीची पूर्तता केली. यानंतर सलग दीड महिन्यांपर्यंत या ग्राहकांना विद्युत पुरवठ्याअभावी ताटकळत ठेवण्यात आले. कधी मीटर उपलब्ध व्हायचे आहे तर कधी वायरमनला वेळ नाही. आदी सबबी सांगून त्रास देण्यात आला. अजूनपर्यंत मोहेकर यांच्या घरात विद्युत पुरवठा करण्यात आलेला नाही. मीटर सुद्धा बसविण्यात आले नाही. तरीपण या ग्राहकाला महावितरण कंपनीने ७५ युनिट वापराचे ८२० रुपयांचे विीज देयक पाठवून बेजबाबदार कारभाराचा कळस गाठला आहे. शहर विभागाचे अभियंता होले यांच्या कामाची पद्धत चांगली असली तरी त्यांचे अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार झाला आहे. तसाही याठिकाणी विद्युत बिलाचा घोळ नेहमीचाच झाला आहे. काहीही कारण नसताना वीजेचा कमी वापर करणाºया ग्राहकांना जास्तीचे बील दिले जात आहे. विजेची चोरी करणाऱ्यांना सवलत व इमानदारीने भरणा करणाºयांकडून आकारणी या धोरणाचा अवलंब होत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.कधी फॉल्टी मीटर तर कधी तांत्रिक कारण सांगून ग्राहकांची पिळवणूक केली जात आहे. अशी संतप्त प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या संदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष घालावे अशी मागणी मोहेकर यांनी केली आहे.
मीटर नसताना रिडींग आले कसे ?
महावितरण कंपनीने दर महिन्याला वीज मीटर रिंडींगची जबाबदारी खासगी लोकांकडे दिली आहे. ते साधारणत ३१ ते १ या तारखांदरम्यान मीटरचा फोटो घेऊन जातात. व त्यानुसार वीज बिल आकारणी केली जाते. याबाबत मोबाईल वर वापरलेल्या वीज युनिटचा मॅसेज पाठविला जातो. व त्यानंतर वीज देयक वितरीत केले जाते. अशी प्रक्रिया आहे. मात्र देवळी येथे चंदा वामन मोहेकर यांच्या घरी वीज मीटर लागलेले नसताना त्यांचे मीटरचे रिंडींग कसे घेण्यात आला हा प्रश्न उपस्थित झाला आहे. वीज देयकावर मीटर रिंडींगचा फोटोही दिला जातो. मोहेकर यांच्या बिलावर फोटो दर्शविण्यात आला आहे. हा फोटो कुणाच्या मीटरचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.