श्वापदांचे हल्ले, नऊ महिन्यांत तीन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:11 PM2018-02-19T22:11:59+5:302018-02-19T22:12:19+5:30
आॅनलाईन लोकमत
वर्धा : आधीच मेटाकुटीस आलेल्या ेशेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात वनक्षेत्र अधिक असल्याने श्वापदांचे हल्ले नित्याचे झाले आहेत. मागील नऊ महिन्यांत जिल्ह्यात ३२ शेतकरी, शेतमजुरांवर श्वापदांनी हल्ले केले. यात तिघांचा बळी गेला असून २९ जण गंभीर जखमी झाले आहेत. या पिडीतांना वन विभागाकडून ४० लाखांची तात्काळ मदतही करण्यात आली आहे.
जिल्ह्यात जंगलाचा भूभाग मोठ्या प्रमाणात आहेत. आठ वनपरिक्षेत्रामध्ये वर्धा, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, हिंगणी, तळेगाव व खरांगणा यांचा समावेश आहे. या वनपरिक्षेत्रात मागील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत वन्यप्राण्यांनी ३२ शेतकरी, मजुरांवर हल्ले केले. यात आर्वी, आष्टी व समुद्रपूर या तीनही परिक्षेत्रात प्रत्येकी एका शेतकºयाला जीव गमवावा लागला. आर्वी परिक्षेत्रातील एक, आष्टीतील तीन, समुद्रपुरातील चार, हिंगणीतील तीन, तळेगावातील पाच तर वर्धा परिक्षेत्रातील १३ असे एकूण २९ जण जखमी झाले आहेत. सोबतच वन्यप्राण्यांमुळे या आठही परिक्षेत्रात २ हजार २२८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. श्वापदांच्या हल्ल्यात तब्बल १२३ जनावरे ठार झालीत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भरपाईसाठी रितसर वनविभागाकडे अर्ज केले असता त्यांना शासनाकडून नुकसान भरपाईही देण्यात आली आहे. यात मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी ८ लाख याप्रमाणे २४ लाख रुपये, २९ जखमींना एकूण १५ लाख ७४ हजार ७५ रुपयाची मदत देण्यात आली. शिवाय गुरांच्या मृत्यू प्रकरणीही भरपाई देण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली.
शेतपिकांचेच केले अधिक नुकसान
वन्यप्राण्यांच्या हैदोसाने जिल्ह्यात सर्वाधिक शेती पिकांचेच नुकसान झाले आहे. आठही परिक्षेत्रात एकूण २ हजार २२८ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्यांना नुकसानीपोटी शासनाकडून १ कोटी १२ लाख ५४ हजार ७४५ रुपयांची मदत देण्यात आली आहे.