बर्ड फ्लूने बिघडविले पोल्ट्रीधारकांचे अर्थकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:03 PM2021-01-23T12:03:35+5:302021-01-23T12:05:12+5:30
Wardha News देशभरात बर्ड फ्लू रोगाने पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण बिघडविले आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा एच ५ एन १ विषाणू कुठेही आढळला नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात असले, तरी पोल्ट्रीधारक कमालीचे धास्तावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशभरात बर्ड फ्लू रोगाने पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण बिघडविले आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा एच ५ एन १ विषाणू कुठेही आढळला नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात असले, तरी पोल्ट्रीधारक कमालीचे धास्तावले आहेत. घाबरू नका, तर पक्ष्यांची काळजी घ्या, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
जिल्ह्यात एकूण बॅकयार्ड आणि ऑर्गनाइझ अर्थात, लहान-मोठे १८४ पाल्ट्रीधारक आहेत. सर्वाधिक व्यवसाय वर्धा, हिंगणघाट आणि देवळी तालुक्यात आहेत. सेलू तालुक्यात ११, आवर्वी १९, आष्टी (शहीद) ४, कारंजा (घाडगे) ८ आणि समुद्रपूर तालुक्यात १थ(??) लहान मोठे पोल्ट्रीधारक आहेत. या सर्व पोल्ट्री व्यवसायात ४ लाख ५४ हजार ८४० कुक्कुट पक्षी आहेत. बर्ड फ्लू हा तापाचा विषाणू आहे. तो विषाणू आपला डीएनए सतत बदलत असतो. हा आजार अचानक सुरू होतो. संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात असलेले पक्षी आजारी पडतात. पाच ते सहा वर्षांपासून सर्व पक्ष्यांचे वर्षातून तीन वेळा लसीकरण करण्यात येते. अंडी, मांस, चिकन किंवा मटण आपल्याकडे १०० अंश तापमानाच्या उकळत्या पाण्यात भरपूर उकडून, शिजवून खातो. ७० अंश तापमानाला बर्ड फ्लूचा विषाणू मरून जातो, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रज्ञा डायगव्हाणे-गुल्हाणे यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण १०६ पशुवैद्यकीय दवाखाने असून, पोल्ट्री व्यावसायिक आणि कोंडी पालन करणाऱ्यांनी या दवाखान्यांशी संपर्क करण्याचे आवाहनही पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
२४ शीघ्रकृती दलाची निर्मिती
बर्ड फ्लूने देशभरात थैमान घातले असून, जिल्ह्यातही या आजाराचा शिरकाव होऊ शकतो. या आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता पशुसंवर्धन विभागाच्या वतीने (रॅपिड रिस्पॉन्स टीम) २४ शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे, तर जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आहे.
तालुकानिहाय पोल्ट्री व्यवसाय
वर्धा -५३
देवळी ३४
सेलू ११
आर्वी १९
आष्टी ०४
कारंजा ०८
समुद्रपूर १७
हिंगणघाट ३८
जिल्ह्यात एकूण पोल्ट्रीधारक १८४
जिल्ह्यात एकूण कुक्कुट पक्षी संख्या ४.५४८४०