भाजप-काँग्रेसला समान नगराध्यक्ष पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:32 PM2018-05-23T23:32:41+5:302018-05-23T23:32:41+5:30
जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे प्रत्येकी अडीच वर्षांचे कार्यकाळ संपुष्टात आले. यामुळे निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा व काँग्रेसला समान नगराध्यक्ष पद प्राप्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे प्रत्येकी अडीच वर्षांचे कार्यकाळ संपुष्टात आले. यामुळे निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा व काँग्रेसला समान नगराध्यक्ष पद प्राप्त झाले आहे. कारंजा आणि आष्टी येथील नगर पंचायतीचे अध्यक्ष पद काँगे्रसला प्राप्त झाले असून समुद्रपूर व सेलू नगर पंचायतीवर भाजपाचे अध्यक्ष विराजमान झाले आहे. केवळ कारंजा (घा.) येथील नगराध्यक्ष पद काँगे्रसला अविरोध प्राप्त करता आले असले तरी उपाध्यक्ष पदासाठी बंडाळीचे चित्र पाहायला मिळाले. अन्य तीन ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या. यात सेलू येथे दोन गटांनी नगराध्यक्ष पद राखण्याकरिता अभद्र युती केल्याने दावा असलेल्या उमेदवाराला पद सोडावे लागले. यात विश्वासघात झाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली. आष्टी (श.) येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सरळ लढत झाली. समुद्रपूर येथे भाजप व राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवारात सरळ लढत झाली. चारपैकी दोन ठिकाणी काँगे्रसला आपले अध्यक्ष व उपाध्यक्ष राखता आले तर सेलू येथे युतीमुळे काँगे्रसला उपाध्यक्ष पद मिळाल्याचे पाहावयास मिळाले.
आष्टीत अध्यक्षपदी अनिता भातकुलकर तर उपाध्यक्षपदी फरीदा सादिक शाह
आष्टी (श.) - आष्टी नगर पंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी नगर पंचायत सभागृहात आयोजित विशेष सभेत पार पडली. अध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे अनिता भातकुलकर व भाजपकडून अजय लेकुरवाळे यांनी अर्ज दाखल केले होते. भाजपचे अॅड. मनीष ठोंबरे यांनी अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेतली होती. यामुळे अध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या अनिता भातकुलकर व भाजपचे अजय लेकुरवाळे यांच्यात सरळ लढत होती. उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या फरीदा सादिक शाह व भाजपचे सुरेश काळबांडे यांनी नामनिर्देशपत्र भरले होते. येथे काँग्रेसचे १०, भाजपचे ६ व अपक्ष एक असे एकूण १७ संख्याबळ आहे. आज दुपारी १ वाजता आयोजित विशेष सभेत झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या भातकुलकर यांना ११ तर भाजपचे लेकुरवाळे यांना ६ मते मिळाली. यात ५ मतांनी काँग्रेसच्या अनिता भातकुलकर विजयी झाल्या. उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या फरीदा सादिक शाह यांना ११ तर भाजपचे सुरेश काळबांडे यांना ६ मते मिळाली. यामुळे उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या फरीदा सादीक शाह यांची वर्णी लागली. पीठासन अधिकारी म्हणून एसडीओ प्रकाश शर्मा यांनी काम पाहिले.