बोंडअळीच्या अनुदानासाठी भाजप जिल्हाध्यक्ष बकाणे यांचा जनतादरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:50 PM2018-12-24T22:50:26+5:302018-12-24T22:50:43+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीच्या अनुदानाबाबत असलेला गोंधळ व संभ्रम दूर करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी थेट तहसीलदारांचे दालन गाठून उलगडा केला. शासनाकडून बोंडअळीचे अनुदान प्राप्त होऊनसुध्दा पैशाचे वाटप होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पैसे वाटपाचे निर्देश देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीच्या अनुदानाबाबत असलेला गोंधळ व संभ्रम दूर करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी थेट तहसीलदारांचे दालन गाठून उलगडा केला. शासनाकडून बोंडअळीचे अनुदान प्राप्त होऊनसुध्दा पैशाचे वाटप होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पैसे वाटपाचे निर्देश देण्यात आले.
तालुक्यातील शेतकºयांनी जिल्हाध्यक्ष बकाणे यांचे कार्यालय गाठून त्यांच्याजवळ बोंडअळीचे अनुदान मिळण्यात होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीमुळे अनुदानाचे पैसे नसल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. बकाणे यांनी या सर्व शेतकऱ्यांना सोबत घेत तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार बोंबर्डे यांच्या दालनात बैठक घेऊन अडचणींचा आढावा घेतला. या तालुक्यात बोंडअळीसाठी १८ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिला हप्ता ५ कोटी व दुसरा साडेसात कोटी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित रकमेपैकी ३ कोटी ७९ लाख रूपये पुन्हा प्राप्त झाले असून त्यापैकी २ कोटी ८ लाख रूपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. शिल्लक रक्कम येत्या दोन दिवसांत वाटप करण्यात येईल, असे तहसीलदार बोंबर्डे व नायब तहसीलदार प्रदीप वर्पे यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची बॅँक खाती चुकली अशांना अनुदान मिळाले नसल्याने ही सर्व बॅँक खाती दुरुस्त करण्याबाबत पटवाऱ्यांना निर्देश दिल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
याप्रसंगी तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख राहुल चोपडा, पं. स. उपसभापती किशोर गव्हाळकर, भाजपचे शहर अध्यक्ष किरण तेलरांधे, समीर ढोक, अविनाश कलोडे व संजय गांधी निराधार समितीचे विनोद राठोड यांची उपस्थिती होती.