भाजप संघाने देशात अराजकता माजविली : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:18 PM2018-10-02T23:18:13+5:302018-10-02T23:19:47+5:30
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह सर्व घटक अडचणीत आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह सर्व घटक अडचणीत आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
वर्धा येथील सर्कस ग्राऊंड मैदानावर आयोजित काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी चव्हाण म्हणाले, देशातील सर्वसामान्यांचा पैसा घेवून पंतप्रधानाचे मित्र देश सोडून गेलेत. देशात ४५ हजार शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांत आत्महत्या केल्या. महाराष्ट्रावर ५ हजार कोटीचे कर्ज झाले आहे. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक चार वर्षांत उभे राहू शकले नाही. मात्र भाजपाचे दिल्ली येथे आलीशान कार्यालय उभे झाले आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहे. चार वर्षांपूर्वी आम्हाला कुठे नेऊन ठेवला रे महाराष्ट्र माझा असे विचारणाºयांना आता महाराष्ट्र कुठे हे विचारण्याची वेळ आली आहे. असे चव्हाण यावेळी म्हणाले.
काँग्रेसचा इतिहास बलीदानाचा- गहलोत
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा इतिहास हा बलीदानाचा इतिहास आहे. महात्मा गांधींपासून इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी आपले बलीदान दिले. मागील वेळी लोकांना खोटे आश्वासन देवून सत्तेवर आलेल्या भाजपमुळे देशाला धोका निर्माण झाला आहे. सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला सहकार्य करावं असे प्रतिपादन काँग्रेस महासचिव खासदार अशोक गहलोत यांनी सांगितले.
लढाई लढण्यासाठी सज्ज व्हा - गुलाबनबी आझाद
खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पतनासाठी तिरस्काराविरूद्ध लढाई नव्याने सुरू करावी लागणार आहे. आणि हा संकल्प वर्धा व सेवाग्रामवरूनच आपल्याला करावा लागेल, असे आवाहन काँग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलाबनबी आझाद यांनी केले.
करो वा मरो ची लढाई - मल्लीकार्जुन खरगे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात करो आणि मरो चा इशारा दिला होता. आतापुन्हा करो आणि मरोची लढाई करण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे. देशातील शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. दलिताचा आवाज दाबला जात आहे. काँग्रेसने त्यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नोटबंदी निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले होते, त्यावेळी या सरकारने काँग्रेसची खिल्ली उडविली होती. परंतू आता नोटबंदी फसली हे समोर आले. हिंसाचाराच्या मार्गावर सरकारची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे देशात पुन्हा युपीएचे सरकार विराजमान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.