दादासाहेबांच्या आरोग्य शिबिराकडे भाजप नेत्यांचीच पाठ; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 01:37 PM2023-10-02T13:37:36+5:302023-10-02T13:38:16+5:30

मतदार संघातील गोतावळाही होतोय कमी

BJP leaders turn their backs on Dadasaheb Keche's health camp; Heavily debated in political circles | दादासाहेबांच्या आरोग्य शिबिराकडे भाजप नेत्यांचीच पाठ; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

दादासाहेबांच्या आरोग्य शिबिराकडे भाजप नेत्यांचीच पाठ; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

googlenewsNext

वर्धा : आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भाजपातच दोन गट पडल्याचे उघडपणे दिसायला लागले आहे. कधीकाळी आमदार दादाराव केचे यांच्या निमंत्रणावरून कार्यक्रमाला उपस्थित राहणारे भाजपचे पदाधिकारी आणि त्यांचा आदेश प्रमाण मानून सावलीसारखे सोबत राहणारे मतदार संघातील कार्यकर्तेही त्यांच्यापासून दूर चालले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नुकताच आर्वी येथील सहकार मंगल कार्यालयात त्यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराकडे भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनीही पाठ फिरवली. त्यामुळे दादासाहेब एकाकी पडलेय काय? अशी चर्चा मतदार संघात रंगायला लागली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यासन अधिकारी आर्वीपुत्र सुमित वानखेडे यांनी मतदार संघातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता धडपड चालविली. त्यामुळे आपसूकच नागरिक आणि कार्यकर्तेही त्यांच्याशी जुळू लागल्याने मतदार संघात दादासाहेबांपेक्षा त्यांचे वजन वाढायला लागले. बरेच वर्ष रेंगाळत राहिलेली कामे वानखेडे यांनी झटपट मार्गी लावण्याचा सपाटा लावला. परिणामी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर वर्धा लोकसभाप्रमुखांची जबाबदारी सोपवून त्यांच्या पंखात आणखीच बळ भरले. यामुळे विधानसभेकरिता भाजपानेदादाराव केचे यांना पर्याय शोधल्याची चर्चा जोर धरू लागली. त्यामुळेच दादासाहेबांच्या सोबत राहणारे पदाधिकारी व कार्यकर्तेही सुमित वानखेडे यांच्या पाठीशी असल्याचे विविध कार्यक्रमातून दिसायला लागले.

दादासाहेबांनी ज्यांना पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली होती. त्यांनीही आता साथ सोडल्याचे दिसायला लागले. एरवी आर्वीतील आमदारांचा कार्यक्रम म्हटला की, जिल्ह्यातील भाजपचे नेते, पदाधिकारी व मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा गोतावळा उपस्थित राहायचा. मात्र, महाआरोग्य शिबिराला भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षाशिवाय कोणताही जिल्ह्यातील पक्षाचा नेता किंवा पदाधिकारी दिसला नसल्याने याबाबत ‘पक्षादेश’ तर झाला नसावा ना? अशीही चर्चा आता रंगायला लागली असून यावरून आगामी निवडणुकीकरिता आमदार दादाराव केचे यांची वाटचाल खडतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अजूनही आर्वीतील दहीहंडीचीच चर्चा

आमदार दादाराव केचे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आर्वीत गोकुळाष्टमीला दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व लोकसभाप्रमुखांना कल्पना व निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे अनेकांमध्ये नाराजीचा सूर होता.

Web Title: BJP leaders turn their backs on Dadasaheb Keche's health camp; Heavily debated in political circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.