मेघेंचा अट्टाहास ठरू शकतो भाजपसाठी अडचणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 02:41 PM2019-03-12T14:41:16+5:302019-03-12T14:41:52+5:30
वर्धा- विद्यमान स्थितीत भारतीय जनता पक्षाचा खासदार विराजमान असताना त्यांची उमेदवारी कापून आपल्या मुलाला उमेदवारी द्या, असा आग्रह माजी मंत्री व भाजपचे नेते दत्ता मेघे यांनी धरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा- विद्यमान स्थितीत भारतीय जनता पक्षाचा खासदार विराजमान असताना त्यांची उमेदवारी कापून आपल्या मुलाला उमेदवारी द्या, असा आग्रह माजी मंत्री व भाजपचे नेते दत्ता मेघे यांनी धरला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पायघड्या घालणे सुरू आहे. सुपुत्र सागर मेघे निवडणूक लढण्यास तयार नसल्याचे वेळोवेळी सांगत असले तरी त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी दत्ता मेघे समर्थक असलेले वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर व माजी खासदार सुरेश वाघमारे यांना पाठवून त्यांची मनधरणी चालविली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार रामदास तडस समर्थक आक्रमक झाले असून मेघे यांचा तडस विरोध हा केवळ पुत्र प्रेमापोटी असल्याचे जाहीररित्या बोलत आहे. भारतीय जनता पक्षाने मेघे यांना भरभरून दिले आहे. मेघे यांचे सुपुत्र समीर मेघे हिंगणा येथून आमदार आहेत. पंकज भोयर यांची उमेदवारी मेघेंमुळेच देण्यात आली. रविवारी मेघेंनी आयोजित केलेल्या बैठकीत केवळ त्यांचे समर्थक व त्यातही वर्धा मतदार संघातीलच लोकं उपस्थित होते. भाजपचा कुणीही महामंत्री व पदाधिकारी उपस्थित नव्हते. यापूर्वी मेघे व तडस यांच्या वादाला जातीचा रंग देण्यात आला. हा रंगच संपूर्ण विदर्भात भाजपला दणका देणारा ठरू शकतो. रामदास तडस हे राष्ट्रीय तैलीक महासभेचे अध्यक्ष आहे. तसेच विदर्भाच्या किमान सहा मतदार संघात तेली समाजाचे मतदान निर्णायक आहे. भाजपच्या संपूर्ण खासदारात तडस एकमेव तेली खासदार आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी कापून मेघे यांचा अट्टाहास पूर्ण केला गेल्यास वर्धा मतदार संघासह भाजपला चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोदिंया, यवतमाळ या मतदार संघातही तडाखा बसू शकतो. त्यामुळे भाजप या प्रश्नावर काय भूमिका घेते हे महत्वाचे राहणार आहे.
पंकज भोयर यांची अडचण वाढणार
डॉ. पंकज भोयर हे वर्धा मतदार संघातून गेल्यावेळी निवडून आले होते. आता तडस यांची उमेदवारी कापून सागर मेघे यांना उमेदवारी द्या याबाबत मोठा पुढाकार घेतला आहे. भोयर यांच्या मतदार संघात सेलू तालुक्यात तेली समाजाचे मोठे प्राबल्य आहे. याभागात भोयर यांचे या भूमिकेमुळे प्रचंड असंतोष असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत मतदार भोयर यांचा हिशोब लावण्याच्या तयारीत आहे.