सभापती पदांवरही भाजपचाच कब्जा
By admin | Published: October 4, 2014 11:30 PM2014-10-04T23:30:25+5:302014-10-04T23:30:25+5:30
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक गोंधळ व हाणामारीने गाजली़ यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते;
वर्धा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक गोंधळ व हाणामारीने गाजली़ यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते; मात्र ही निवडणूक शांततेत पार पडली़ जि़प़ सभापती पदावर २४ विरूद्ध १७ मतांनी विजय मिळवित भाजपानेच कब्जा केला़
जि़प़ सभापती पदाची निवडणूक सर्वांना कुतूहलाचा विषय ठरला होता़ अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बहुमत नसतानाही काँगे्रसचे सदस्य गैरहजर राहिल्याने भाजपाला सत्ता काबीज करता आली होती़ सदस्यांच्या गैरहजेरीवरूनच सभेत गदारोळही करण्यात आला होतो़ अखेर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी चित्र रणनवरे यांची तर उपाध्यक्ष पदावर विलास कांबळे यांची वर्णी लागली होती़ हा प्रकार पाहूनच पोलीस यंत्रणेने सभापती पदाच्या निवडणुकीत गदारोळ होऊ नये म्हणून सकाळपासून जिल्हा परिषद परिसरात बंदोबस्त लावला होता़
शनिवारी दुपारी २ वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला़ समाज कल्याण सभापती पदासाठी काँगे्रसकडून नंदकिशोर कंगाले तर भाजकडून वसंता पाचोळे, महिला व बालकल्याण सभापती पदाकरिता काँगे्रसच्या निलिमा दंढारे तर भाजपच्या चेतना मानमोडे, विषय समित्यांच्या सभापती पदाकरिता काँगे्रसचे गजानन गावंडे, मनोज चांदुरकर तर भाजपचे मिलिंद भेंडे व अपक्ष श्यामलता अग्रवाल यांनी अर्ज दाखल केला होता़ यात समाज कल्याण सभापती पदावर २४ मते घेत भाजपचे वसंता पाचोळे विजयी झाले़ कंगाले यांना १७ मते मिळाली़ महिला व बालकल्याण सभापतीपदी २४ मते घेत चेतना मानमोडे विजयी झाल्या तर १७ मते घेणाऱ्या निलिमा दंढारे पराभूत झाल्या़ विषय समित्यांच्या सभापती पदावर भाजपचे मिलिंद भेंडे व अपक्ष श्यामलता अग्रवाल यांची वर्णी लागली़ त्यांना प्रत्येकी २४ मते मिळाली तर गावंडे व चांदुरकर पराभूत झाले़ शांततामय वातावरणात जिल्हा परिषद सभापती पदाची निवडणूक पार पडल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले जात होते़(कार्यालय प्रतिनिधी)