भाजप, संघाकडे इतिहासही आणि भविष्यही नाही; नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 09:33 PM2021-11-15T21:33:42+5:302021-11-15T21:34:41+5:30
Wardha News स्वातंत्र्याचा इतिहास आणि काँग्रेसचे विचार गावखेड्यात पोहोचवावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. सेवाग्राम येथील चारदिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
वर्धा : भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहास नाही आणि भविष्यही नाही, त्यामुळे इतिहासाची तोडमोड करून स्वातंत्र्याचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी स्वातंत्र्याचा इतिहास आणि काँग्रेसचे विचार गावखेड्यात पोहोचवावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. सेवाग्राम येथील चारदिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, सचिन राव, पालकमंत्री सुनील केदार, आ. रणजित कांबळे, काँग्रेस संघटन सचिव वामशी रेड्डी, सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, राष्ट्रीय सचिव हर्षवर्धन सपकाळ, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षणाकरिता ३४ राज्यांतून आलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना चार दिवसांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री बी. के. हरिप्रसाद, खा. राजीव गौडा, प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत, दिलीप रे, सेवाग्रामचे माजी अध्यक्ष मा. म. गडकरी, डी. पी. राय, दीपक बाबरिया आदींनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, काँग्रेसने राज्यव्यापी जनजागरण अभियानाला वर्ध्यातील करंजी (भोगे) या गावातून सुरुवात केली. काँग्रेसच्या नेत्यांनी रात्रभर गावात मुक्काम करून सोमवारी सकाळी गावात प्रभातफेरी काढून केंद्र सरकाच्या चुकीच्या धोरणाविषयी जनजागृती केली.
डॉ. शिरीष गोडे भाजपमधून काँग्रेसमध्ये
जनजागरण रॅलीदरम्यान सोमवारी सकाळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली. या रॅलीत सहभागी सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश घेतला. पटोले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. मूळचे काँग्रेसी असलेले डॉ. शिरीष गोडे २००८ पासून भाजपत गेले होते.